
बिहारमधील छपरा येथे विषारी दारूमुळे 53 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सिवान येथे 5 तर बेगुसरायच्या तेघरा येथेही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. विषारी दारूकांडात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी विरोधी पक्ष असलेल्या भाजपने विधानसभेत केली, मात्र दारू पिऊन मेलेल्यांना सरकार एक पैसाही देणार नाही, अशी ठाम भूमिका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेत विरोधकांनी केलेली नुकसानभरपाईची मागणी फेटाळून लावली.
बिहार विधानसभेत आज दारूकांडामुळे सलग तिसऱया दिवशी प्रचंड गदारोळ झाला, खुर्च्या फेकण्यात आल्या. आता सरकार बरखास्त करण्याची मागणी करत विरोधकांनी राजभवनावर मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. विधानसभेत आज विषारी दारूकांडामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने तातडीने 10 लाखांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय सिन्हा यांनी केली. त्यावर उत्तर देताना नितीश कुमार यांनी दारू पिऊन मृत्यू झाला तर सरकार एक पैसाही देणार नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, या घटनेत असंवेदनशिलता दाखविणाऱया नितीशकुमार यांचा सत्यानाश अटळ आहे, असा संताप रणनितीकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला.

































































