
>> रंगनाथ कोकणे
जगभरात मधमाशांच्या जवळपास 20 हजार प्रजाती आढळतात. यापैकी अधिक प्रजाती जंगलात राहतात आणि अनेक प्रजाती मानवी वस्त्यांमध्ये असलेल्या झाडांवर, इमारतींवर आपले पोळं बनवितात, परंतु ताज्या संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. संशोधनानुसार, प्रदूषण आणि कीटकनाशकांमुळे आज मधमाशांचे सरासरी आयुर्मान कमी झाले आहे. मधमाशीला आपल्या जैवसृष्टीत एक विशिष्ट स्थान आहे. परागीकरणामध्ये मधमाशांची भूमिका मोठी आहे. त्यांची संख्या घटत गेल्यास खाद्यान्न संकट निर्माण होऊ शकते.
मधमाशा जैवसाखळीमध्ये, अन्नसाखळीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पृथ्वीवरील अगणित वनस्पतींची परागीकरणाची प्रक्रिया मधमाशांमुळेच शक्य होते. मधमाशा सुमारे 70 टक्के पिकांचे परागीकरण करतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास आपण जे अन्न खातो त्याचा दोनतृतीयांश हिस्सा मधमाशांनी केलेल्या परागीकरणातूनच आपल्याला मिळतो. त्यामुळेच महान शास्त्र्ाज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनीही सांगितले होते. ते म्हणाले होते, मधमाशा या पृथ्वीतलावरून नामशेष होतील, तिथून पुढे मानवी वंशाला जगण्यासाठी अवघी चार वर्षे मिळतील. मधमाशा राहिल्या नाहीत तर परागीकरण होणार नाही आणि पशूंसह माणसेही जगू शकणार नाहीत.
हा धोका त्यांनी अनेक वर्षांपूर्वी निर्देशित केला होता, परंतु त्यातून कोणताही बोध मानवी समूहाने घेतला नाही. परिणामी, आज मधमाशांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. नुकतेच काही शास्त्र्ाज्ञांनी यासंदर्भात संशोधन करून मांडलेल्या निष्कर्षानुसार जगभरात मधमाशांवर अनेक प्रकारची संकटे घोंघावत आहेत. प्रचंड वेगाने वाढणारे वायुप्रदूषण आणि कीटकनाशके व रासायनिक खतांचा बेसुमार वापरामुळे आज मधमाशांचे आयुर्मान कमी झाले आहे.
शास्त्र्ाज्ञांचे म्हणणे आहे की, जगभरात मधमाशांच्या जवळपास 20 हजार प्रजाती आढळतात. यापैकी अधिक प्रजाती प्रामुख्याने जंगलांमध्ये वास्तव्यास असतात; तर काही प्रजाती मानवी वस्त्यांमध्ये असलेल्या झाडांवर, इमारतींवर आपले पोळं बनवितात. धक्कादायक बाब म्हणजे, या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. जगभरात सतत वाढणारे प्रदूषण, मधमाशांचे प्रमुख अन्न असलेल्या फुलांच्या झाडाझुडपांची झपाटय़ाने कमी होणारी संख्या, अपरिमित वृक्षतोड, कृषी आणि बागबगीच्यात वाढता कीटकनाशकांचा वापर याचा दुष्परिणाम मधमाशांवर दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी फ्रांसिसी नॅशनल रिसर्च इन्स्टिटय़ूट फॉर ऍग्रिकल्चर, फूड ऍण्ड एन्व्हायरमेंटने आपल्या एका अहवालात असे म्हटले की, परागीकरण करणाऱ्या कीटकांना शेतात वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. या अहवालानुसार, जंगलातील झाडेझुडपांच्या अनेक प्रजातींच्या फुलांमध्ये पराग कण आणि रसाचे म्हणजेच मकरंदाचे प्रमाण कमी झाले आहे. याचा फटका मधमाशांनाही बसतो आहे. अनेक अभ्यासकांच्या मते, जागतिक तापमानवाढीचा (ग्लोबल वार्ंमग) फटका मधमाशांना बसतो आहे. वातावरण बदलामुळे सृष्टीचक्र बदलले आहे. असमान पाऊसमान, दुष्काळ, पूर यांचाही मोठा परिणाम मधमाशांवर पडतो आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या मते मानवासाठी उपयुक्त असणारी 75 टक्के फळे आणि बीजधारक शेतपिके परागीकरण करणाऱ्या कीटक जिवांवर अवलंबून आहेत. 2019 मध्ये शास्त्र्ाज्ञांनी समोर आणलेल्या माहितीनुसार, जगभरात कीटकांच्या एकूण प्रजातींपैकी जवळपास 50 टक्के प्रजाती नष्ट होत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, कीटकांची एकतृतीयांश संख्या या शतकाच्या शेवटी पृथ्वीवरून नामशेष होऊ शकते. संशोधन अहवाल आणि आकडे हे बाजूला ठेवले तरी मधमाशांसारखे कीटक अलीकडील काळात फारसे दिसत नाहीयेत ही बाब स्पष्ट आहे.
काही वर्षांपूर्वी मधमाशांचे पोळे सर्रास दृष्टीस पडायचे, पण आता महानगरांतून तर ते जवळपास हद्दपारच झाले आहे. ग्रामीण भागातसुद्धा मधमाशांची पोळं क्वचितच आढळून येताहेत. यामागचे खरे कारण म्हणजे त्यांच्यासाठी अनुकूल असलेल्या घटकांची कमतरता, पाण्याचे स्रोत, फुलझाडे ही मधमाशांची प्राथमिक गरज आहे, पण त्यामध्ये घट झाल्यामुळे मधमाशांचे जीवन धोक्यात आले आहे. याशिवाय बदलत्या पर्यावरण परिस्थितीमुळेही कीटकांपुढे वेगवेगळी संकटे उभी राहिली आहेत. शेतापासून बगिच्यांपर्यंत कीटकनाशक आणि रसायनांचा वाढता वापर मधमाशांच्या प्रजननास मारक ठरत आहे. काही अभ्यासांमधून नियोनिकोटिनॉइड्स हा कीटकनाशकातील घटकच मधमाशांच्या ऱहासाला कारणीभूत ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. हा घटक मधमाशांच्या संपूर्ण कार्यपद्धतीतच अडथळा ठरला आहे.
फूड ऍण्ड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या मतानुसार जगभरात उत्पादित अन्नधान्यापैकी एकतृतीयांश अन्नधान्यांचे उत्पादन मधमाशांवर निर्भर असते. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणासंबंधी संस्थेच्या मतानुसार कीटकनाशकांमुळे मधमाशांच्या स्मरणशक्तीवर थेट परिणाम होतो आहे. फुले किंवा फळे यांचा गंध घेण्याची मधमाशांची शक्ती कीटकनाशकांच्या संपर्कात येताच कमी होते. त्यामुळे त्या नेमक्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत आणि परागीकरणाची प्रक्रिया विस्कळीत होते. पिकांवर फवारलेली रसायने परागकणांसोबत मधमाशांच्या शरीरात पोहोचतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात वेगवेगळय़ा समस्या निर्माण झाल्या आहेत.
ज्या वेगाने जगभरात कीटक जिवांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे त्यामुळे अन्नधान्योत्पादनात घट झाल्यास मानव काय करणार? ज्या क्षणी मधमाशा पूर्णांशाने नामशेष होतील, त्या क्षणापासून तीन महिन्यांच्या आत जगभरातील पिकांचे उत्पादन घटेल. किराणा दुकानातला माल जवळजवळ निम्म्यावर येईल. सहाच महिन्यांत आपल्याला सर्व शेतांमध्ये केवळ गहू आणि मक्याची पेरणी करावी लागेल; कारण याच दोन पिकांचे परागीकरण हवेद्वारे होते. आपला आहार मर्यादित होईल. आहारातील विविधता आणि पौष्टिकता संपून जाईल. कुपोषणामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या डोके वर काढतील. औषधपाण्यावरचा खर्च वाढेल. ही भयावह स्थिती ओढावू द्यायची नसेल तर आपल्याला हे संकट मुळापासून समजून घ्यावे लागेल आणि त्या दिशेने योग्य पावले उचलावी लागतील. यामध्ये शेतांमधील कीटकनाशकांचा वापर नियंत्रणात आणणे, रासायनिक खतांचा बेसुमार वापर कमी करणे, जैविक-सेंद्रीय शेतीकडे वळणे, सर्वोच्च प्राधान्य देऊन वायुप्रदूषण कमी करणे यांसारख्या उपाययोजनांबाबत गांभीर्याने कृती झाली पाहिजे,
(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत.)























































