मालवण राज्यस्तरीय सागरी जलतरण – कोल्हापूरचा पृथ्वीराज डांगे वेगवान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य हौशी जलतरण संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी जलतरण संघटना व मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणच्या चिवला बीचवर आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरणाच्या 5 किमीच्या प्रमुख स्पर्धेत मुलांच्या गटात वेगवान जलतरणपटूचा मान कोल्हापूरच्या पृथ्वीराज डांगेने मिळविला, तर नागपूरची संजना जोशी मुलींच्या गटातून वेगवान जलतरणपटू ठरली. तीन किमीच्या स्पर्धेतून वेदांत गडाख व आरोही पालकडे यांनी बाजी मारली. या स्पर्धेत नागपूर, कोल्हापूर, ठाणे, बेळगाव, रायगड येथील स्पर्धकांचे वर्चस्व दिसून आले.

मालवण चिवला बीच येथे पार पडलेल्या स्पर्धेत पहिल्या दिवशी 500 मीटर, 1 कि.मी., 2 कि.मी. अंतराच्या मुलगे- मुली, ज्येष्ठ पुरुष व महिला, दिव्यांग पुरुष व महिलांच्या स्पर्धा झाल्या. यातून पाखी हलगेकर (बेळगाव), प्रिन्स काठवले (ठाणे), वेदांत मिसळे (बेळगाव), रेवा परब (ठाणे), आयुषी आखाडे (ठाणे), अनिष पई (बेळगाव) यांनी विजेतेपद पटकावले. स्पर्धेचा पुरस्कार सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. दीपक परब, राज्य संघटना सचिव राजेंद्र पालकर, अॅड. नाखवा, राज्य उपाध्यक्ष राजेश मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला.