
>> शिरीष कणेकर
‘माझी फिल्लमबाजी’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमाच्या शंभराव्या प्रयोगाला पु. ल. देशपांडे यांना बोलावण्याची माझी अतीव इच्छा होती. पु. ल. समोर पहिल्या रांगेत बसलेत आणि मी प्रयोग करतोय या कल्पनेने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. त्यात भीती, दडपण, संकोच या भावना वाहून गेल्या होत्या.
मी पु. लं.ना पुण्याला फोन लावला.
‘मी पु. ल. देशपांडेंशी बोलू शकतो का?’ मी शुष्क पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवीत म्हणालो.
‘कोण बोलतंय?’ पलीकडून स्त्रीकंठातून विचारणा झाली.
‘माझं नाव शिरीष कणेकर.’ नाव सांगताना मला इतका कमीपणा कधीच वाटला नव्हता.
‘थांबा देते.’
‘बोला।़।़’ पु. लं.चा सुपरिचित दिलखुलास आवाज आला. (आयला, त्यांनी माझी एखादी ओळ वाचली तर नसेल?)
‘येत्या 7 डिसेंबरला मुंबईत रवींद्र नाटय़मंदिरात माझा ‘माझी फिल्लमबाजी’चा शतक महोत्सवी प्रयोग आहे. त्याला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून याल का? म्हणजे आय मीन, याच!’
‘त्या दिवशी मी मुंबईत असण्याची शक्यता कमी आहे. असलो तर अवश्य येईन. पुन्हा आठवण करायची गरज नाही. मी लक्षात ठेवीन.’
‘पण तुम्ही येताय की नाही हे कसं कळणार?’ मी बुचकळय़ात पडून विचारलं.
‘समोर दिसलो की आलो.’ इति पु. ल.
‘आणि समोर दिसला नाहीत, तर माझ्या टीमला व तुमच्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मी काय सांगू? ते पु.ल. देशपांडे ना? आले असतील तर बसले असतील बाल्कनीत कुठे तरी कोपऱ्यात किंवा पास नाही म्हणून रवींद्रच्या पायऱ्यांवर बसले असतील, आपल्याला काय करायचंय!’
पु.ल. खो खो हसले. मी प्रत्यक्ष पु.लं.ना हसवलं होतं. ‘तुमको हंसा दिया, प्यार सिखा दिया, शुक्रिया तो शुक्रिया कीजिये साहब. माना जनाब ने पुकारा नही…’
पण शेवटी पु. ल. आले नाहीत. दिलीपकुमार व पु.ल. या माझ्या दोन दैवतांना मी आयुष्यात एकदाही भेटू शकलो नाही. लता मंगेशकरने सगळी कसर भरून काढली म्हणा.
मी व. पु. काळेंच्या घरी गप्पा मारीत बसलो होतो. (पु. ल. देशपांडेंचा पु. ल. आणि व. पु. काळेंचा व. पु. असा शॉर्टकट होतो, तर माझा शि. म. का झाला नाही? वाचकांचं प्रेम कमी पडलं असावं.)
व. पु. स्वयंपाकघराकडे तोंड करून म्हणाले, ‘अहो निगुडकर, बघा कोण आलंय, जरा चहा टाका.’
‘निगुडकर?’ मी अचंब्याने विचारलं.
व. पु. जणू माझ्याकडून हा प्रश्न येण्याची वाटच बघत होते. ते पुढे सरसावले व ‘निगुडकर’ची व्युत्पत्ती व प्रयोजन सांगू लागले, ‘त्याचं काय आहे, तुम्हीच बघा. या बायका लग्नाला पंचवीस-पंचवीस, तीस-तीस वर्षे झाल्यावरही आमच्याकडे असे म्हणून काहीतरी सांगतात तेव्हा तो सासरचा नव्हे, तर हटकून माहेरचा उल्लेख असतो. जास्त काळ माहेरी काढला की सासरी? पण नाही, ‘आमच्याकडे’ म्हणजे माहेरी. तुम्हाला सासर कधी आपलं वाटणारं? मुलांची लग्ने झाली तरी आमच्याकडे म्हणजे माहेरी? त्या मनाने अशा माहेरीच जगत असल्यामुळे त्यांना उगीच सासरच्या नावाने का ओळखा? का ओळख द्या? तुम्ही माहेरच्या तर माहेरच्या. म्हणून मी तिला ‘निगुडकर’ म्हणतो कळलं?’
तेवढय़ात ‘निगुडकर’ चहा घेऊन हसत हसत बाहेर आल्या.
एका वृत्तपत्राच्या (नामसे क्या काम, जॉनी है दिल का गुलाम) रविवार आवृत्तीने खपाचा विक्रम गाठला होता. साहजिकच वृत्तपत्राच्या संपादकाला अमाप आनंद झाला. त्या आनंदात तो कार्यालयाच्या बाहेर उभा राहून एका भल्या मोठय़ा खोक्यातून येणाऱया-जाणाऱ्यांना पेढे वाटत होता व आनंदात सहभागी करून घेत होता. माझ्याही हातावर त्याने पेढा ठेवला.
‘अभिनंदन – अभिनंदन.’ मी पुटपुटलो.
‘घ्या आणखी एक घ्या.’ त्याने आग्रह केला.
‘नको हो.’ मी वरमून म्हणालो, ‘डायबेटिस आहे.’
‘असू द्या हो. घ्या तुम्ही. एवढय़ा मोठय़ा खपात तुमचाही नखाएवढा वाटा असेलच की!’
पेढा घ्यायला पुढे केलेला हात मी शॉक बसल्यागत मागे घेतला. हे काय मध्येच? सगळं छान चाललं होतं, चांगलं चाललं होतं. मला ओरबडायची काय गरज होती? आनंदाच्या क्षणीही स्वभावानुसार त्याने खंजीर माझ्या कुशीत खुपसला होता.
‘खपातील वाटय़ावर पेढे ठरणार असतील, तर तुम्ही स्वतः कणभरही खाऊ शकणार नाही.’ मी थंडपणे म्हणालो.
त्याक्षणी मला कळलं की, या पेपरमधली आपली सद्दी संपली. ‘जाने दो, लेखणी सलामत तो पेपर पचास.’ अपमान गिळण्यासाठी मी जन्माला आलो नव्हतो, सॉरी…!
[email protected]


























































