बेरोजगारी व बलात्काराच्या प्रलंबित प्रकरणांचं काय? उर्फी जावेदचा चित्रा वाघ यांना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या बोल्ड आणि विचित्र कपड्यांमुळे कायम सोशल मीडियावर चर्चेत असणारी मॉडेल उर्फी जावेद आता महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आली आहे. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दोन दिवसांपूर्वी उर्फी जावेदचा एक व्हिडिओ ट्विट करत संतप्त प्रतिक्रिया दिली होती. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे उर्फीला बेड्या ठोकण्याची मागणी केली होती. मात्र यावर उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना सणसणीत उत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या होत्या की, शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत, रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होत आहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.

यावर उर्फी जावेदने चित्र वाघ यांना उत्तर दिले की, सध्याच्या राजकारण्यांना पाहून वाईट वाटतं. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला टार्गेट केलं जात आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष दिला जातोय. समाजामध्ये आणखी काही मुद्दे आहेत, बेरोजगारी, लाखो बलात्काराच्या केसचे निकाल प्रलंबित आहेत त्याचं काय? असा सवाल उर्फी जावेदने केला आहे. माझ्यावर टीका करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या महिलांना खरंच प्रत्यक्ष मदतीची गरज आहे त्यांना तुम्ही का मदत करत नाही? महिलांचं शिक्षण, लाखो बलात्काराची प्रलंबित प्रकरणं यावर आपण का बोलत नाही, असं उर्फी जावेदने म्हटलं आहे.