
पैठण तालुक्यातील बोकूड जळगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून नवनिर्वाचित महिला सरपंचाचे पुत्र तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्यावर मिंधे गटाच्या पराभूत उमेदवाराकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पैठण तालुक्यातील बोकूड जळगाव येथे 18 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांनी पॅनल उभे केले होते. निवडणुकीत भाऊसाहेब तारमळे यांच्या आई मीराबाई सुभाष तरमळे या सरपंचपदी विजयी झाल्या. याविषयीचा राग मनात ठेवून शनिवार, 31 रोजी रात्री 11 वाजता मिंधे गटाचे पराभूत उमेदवाराचे पती, मुलगा व समर्थक अशोक रामनाथ नागे, मुलगा अनिकेत अशोक नागे, आकाश अशोक नागे, पांडुरंग भागचंद नागे, सुनील रूपचंद खरात, राजू बनकर, दिनेश राठोड यांनी भाऊसाहेब तरमळे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
भाऊसाहेब तरमळे यांच्यावर झालेला हल्ला बघून सोडवण्यासाठी गेलेले बोकुड जळगाव येथील विकास भाऊसाहेब लोखंडे, भाऊसाहेब बाबुराव लोखंडे, शकुंतला भाऊसाहेब लोखंडे आणि जांभळी येथील ओंकार रामदास निर्मळ हे देखील जखमी झाले आहेत. या घटनेमुळे बोकूड जळगावमध्ये तणाव निर्माण झाला असून, बिडकीन पोलिसांनी बोकूड जळगाव येथे पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. बिडकीन पोलीस ठाण्यात दोन गटांच्या तक्रारींवरून परस्परांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी तपास सुरू केला असून, स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी पांडुरंग भागचंद नागे यास ताब्यात घेतले. पोलिसांचे पथक फरार आरोपी अनिकेत अशोक नागे, राजू बनकर, आकाश अशोक नागे, दिनेश राठोड, अशोक रामनाथ नागे, सुनील रूपचंद खरात यांचा शोध घेण्यासाठी जालन्याकडे रवाना झाले आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक पक्षविरहित असते. असे असले तरीही बोकुड जळगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना व कॉग्रेस आघाडी व भाजप-शिंदे गट अशी लढत झाली. पोस्टर, बॅनर व प्रसिद्धी पत्रकाद्वारे या निवडणुकीत पक्ष व नेत्यांचे फोटो अन् जाहीर प्रचार करण्यात आला होता.




























































