वीज कामगारांचा संप अटळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभिंयते, अधिकारी संघर्ष समितीने बुधवार 4 जानेवारीपासून जाहीर केलेला 72 तासांचा संप अटळ असल्याचे दिसत आहे. महावितरणच्या भांडूप परिमंडळात सरकारने अदानी इलेक्ट्रिसिटीला समांतर वीज वितरण परवाना देऊ नये या मागणीसाठी वीज कामगारांच्या संघर्ष समितीने संपाची हाक दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर आज आयोजित केलेली ऊर्जा सचिव आणि संघर्ष समिती यांच्यामधील चर्चा फिस्कटली आहे.

महावितरण कंपनीच्या नफ्याच्या भागात अदानी सारख्या खाजगी भांडवलदाराचा समांतर वीज वितरणाचा परवाना मागणी आम्ही कदापी सहन करणार नाही असे बजावतानाच सरकार व प्रशासनाने याबद्दल भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी संघर्ष समितीने केली. त्यावर प्रधान ऊर्जा सचिवांनी आपण तुमच्या मागण्याबाबत सहमत असल्याचे सांगितले. मात्र वीज कंपन्याचे खाजगीकरण करणार नाही असे आश्वासन दिले नाही. त्यामुळे संघर्ष समितीने त्याच ठिकाणी बैठक घेत 4 जानेवारीच्या मध्यरात्रीसापून 72 तासांच्या संपावर ठाम असलचे स्पष्ट केले.