
संगीत रंगभूमीपासून ते पत्रकारितेपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे विद्याधर गोखले ऊर्फ अण्णा यांच्या ‘इंद्रधनुष्या’चे अनोखे रंग आज मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघ सभागृहात उलगडले. पत्रकार, वक्ता, नाटककार, लेखक, कवी, राजकारणी, निर्माते अशा अनेक भूमिका अण्णांनी आयुष्याच्या रंगमंचावर कशा यशस्वीपणे निभावल्या हे मान्यवरांनी स्पष्ट केले.
निमित्त होते विद्याधर गोखले यांच्या आजपासून सुरू झालेल्या जन्मशताब्दी वर्षाचे. त्या पार्श्वभूमीवर ‘चतुरंग प्रतिष्ठान’ने ‘गोखले अण्णा नावाचे इंद्रधनुष्य’ हा परिसंवाद आयोजित केला होता. ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुलकर्णी यांनी ‘संपादक गोखले’ यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘अण्णा हे हाडाचे शिक्षक व नाटककार असल्याने त्यांचा प्रत्येक शब्द साधा असला तरी साभिनय असायचा. ते ‘सावरकर स्कूल ऑफ थॉट’चे विद्यार्थी होते; पण त्यांनी कधीही घाणेरडय़ा शब्दांत महात्मा गांधींवर टीका केली नाही. त्यांनी कधीही व्यक्तीपूजा केली नाही. त्यांची पत्रकारिता म्हणजे मराठी पत्रसृष्टीतील ‘संगीत सौभद्र’ आहे, अशा शब्दांत कुलकर्णी यांनी गोखले यांच्या पत्रकारितेचा गौरव केला.
संगीत रंगभूमीचे पुनरुज्जीवन केले
दूरदर्शनच्या निर्मात्या किरण चित्रे यांनी अण्णांवर बोलताना त्यांच्या संगीत नाटकांचा आढावा घेतला. ‘पंडितराव जगन्नाथ’, ‘जय जय गौरीशंकर’, ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ या नाटकांमुळे विसाव्या शतकातील मराठी संगीत रंगभूमीचे पुनरुज्जीवन झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. गीतकार प्रवीण दवणे यांनी अण्णांच्या विविध नाटय़पदांमधील काव्यात्मगुणांचा आढावा घेतला. ज्येष्ठ नाटय़ अभिनेते जयंत सावरकर यांनी आपणास अण्णांनी ‘स्वतःची पिंमत तू कधी सांगू नकोस’ अशी शिकवण दिल्याचे सांगितले. गायिका मधुवंती दांडेकर यांनी विद्याधर गोखले यांच्या आठवणी सांगून त्यांची दोन नाटय़पदेही गायली. ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, ‘कालनिर्णय’चे जयराज साळगांवकर यांनीही अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला. वासंती वर्तक यांनी सूत्रसंचालन केले.

























































