सांगलीत विजेचा खेळखंडोबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिह्यातील महावितरणचे अडीच हजार कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले. त्यामुळे जिह्यातील जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील काही गावांतील वीज गायब झाली. त्याचा नागरिकांना काहीसा त्रास सहन करावा लागला. या कालावधीत कंत्राटी कर्मचाऱयांनी खंडित वीजपुरवठा सुरू करण्याची सेवा बजावली. दरम्यान, विविध विभागांतील कर्मचारी, अधिकारी यांनी एकत्रित येत सरकारविरोधात निदर्शने करीत घोषणा दिल्या.

सांगली जिह्यात महावितरणचे 2 हजार 600 कर्मचारी आहेत. शिवाय अभियंत्यांची संख्या सुमारे शंभरहून अधिक आहे. यापैकी सुमारे 92 टक्के म्हणजे अडीच हजार कर्मचारी संपात सहभागी झाले होते. महावितरण कंपनीने कंत्राटी कर्मचाऱयांच्या बळावर रात्री 12 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत काम सुरळीत सुरू ठेवले. यामुळे जिह्यातील घरगुती, औद्योगिक तसेच कृषीचा वीजपुरवठा सुरळीत सुरू राहिला. मंगळवारी मध्यरात्रीपासून महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली तीनही वीज कंपन्यातील 31 कामगार संघटना 72 तासांच्या संपावर गेले होते. विविध संघटनांना संलग्न असलेल्या कंत्राटी कामगाराच्या संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या.