
देवगड येथील मळईमध्ये बिबट्याने सकाळी 11 वाजता एका वासराचा फडशा पाडला. त्यामुळे या परिसरात घबराट पसरली. स्थानिक नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. याआधीही येथे अशीच घटना घडली होती.
देवगड मधील मळईवाडी येथे पुन्हा एकदा बिबट्याने दहशत माजविण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षी जुलै महिन्यात मळई येथीलच मनोज धुरी यांची तीन गुरे बिबट्याने मारून दशहत निर्माण केली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी बिबट्याने पुन्हा एकदा मुक्त संचार करण्यास सुरुवात केली आहे. आता बिबट्याचा दिवसाढवळ्या वावर हा चिंतेचा विषय बनला आहे. गुरुवारी सकाळी 11 वा.सुमारास देवगडहून मळइकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मुख्य उतारावरच संतोष कणेरकर हे टेम्पो घेऊन मळईमध्ये जात असताना त्यांनी बिबट्याला पाहिले. त्याचवेळी मळई येथून कॉलेजला जाणाऱ्या दोन विद्यार्थीनींच्याही बिबट्या नजरेस पडल्याने त्यांची भीतीने गाळण उडाली.
त्या दोन्हीही विद्यार्थिनी ओरडत धावत मागे घरी गेल्या. मळईमधील स्थानिकांनीच दिवसाढवळ्या बिबट्याला पाहिले. त्यामुळे परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवस बेपत्ता असलेला किशोर कणेरकर यांचा छोटा पाडाही गुरुवारी सकाळी मृतावस्थेत समद शेख यांच्या बागेत सापडला. त्याचाही बिबट्याने फडशा पाडला असून यामुळे मळईमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा पुन्हा दिसू लागल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

























































