
तालुक्यातील शिराढोण येथे झेंडय़ाचा वाद पुन्हा चिघळला आहे. काल मंगळवारी रात्री भगव्या झेंडय़ाशेजारीच हिरवा झेंडा लावण्यात आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. तणावाचे रूपांतर भीषण दंगलीत झाले. रात्री दोन गटांत तुफान दगडफेक झाली. यात चार पोलीस जखमी झाले. शिराढोणमध्ये संचारबंदी लावण्यात आली असून गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. शिराढोण येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगवा झेंडा लावण्यावरून चार महिन्यांपूर्वी वाद झाला होता. महसूल, पोलीस प्रशासनाने तोडगा काढून वाद मिटविला होता. मंगळवारी रात्री भगव्या झेंडय़ाच्या बाजूला मुस्लिमांनी हिरवा झेंडा लावला. हा प्रकार कळताच संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली.



























































