वेब न्यूज – प्लॅस्टिकचा पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

प्लॅस्टिकचा  पाऊस? हे काय आत नवे? तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गेला काही काळ जगभरात अनेक ठिकाणी प्लॅस्टिकचा पाऊस पडत आहे. हे प्लॅस्टिक तुमच्या आमच्या सामान्य डोळ्यांना दिसणारे नाही, पण या पावसाने जगातील अनेक स्वच्छ आणि प्रदूषण कमी असलेली शहरेदेखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालली आहेत. वैज्ञानिकांनी याबद्दल कडक शब्दांत इशारा दिलेला आहे.

प्लॅस्टिकचा पाऊस म्हणजे नक्की काय? तर वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार, अभ्यासानुसार हे मायक्रोप्लॅस्टिक्स आहेत, जे उघडय़ा डोळ्यांनी दिसत नाहीत, परंतु जर ते जर जमा केले गेले तर प्लॅस्टिकचा एक मोठा डोंगर उभा राहील. आता हे समजून घ्यावे लागेल की प्लॅस्टिकचा पाऊस का पडतोय आणि हे प्लॅस्टिक येते कुठून? आणि याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहे? या चिंताजनक पावसात येणाऱ्या मायक्रोप्लॅस्टिकचा आकार हा अवघा 5 मिमी इतका असतो. मायक्रोप्लॅस्टिक हे खेळणी, कपडे, वाहने, रंग, कारचे जुने टायर किंवा जवळपास कशातही असतात. या सर्व गोष्टींमधून आणि माणसांमधून ते समुद्रापर्यंत पोहोचत आहे. त्यानंतर ते समुद्राच्या परिसंस्थेचा एक भाग बनतात आणि पावसाच्या रूपात पृथ्वीवर परत येतात.

चिंताजनक बाब म्हणजे ‘सायन्स जर्नल’मध्ये अमेरिकेवर केलेल्या अभ्यासात अशा एका शहराचा समावेश करण्यात आला आहे जिथे अजिबात प्रदूषण नाही. येथे सुमारे 14 महिने पावसाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत एकाच महिन्यात तेथे एक हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त प्लॅस्टिकचा पाऊस पडल्याचे दिसून आले. हा अभ्यास करण्यात आलेला परिसर पूर्णपणे संरक्षित आहे, येथे अनेक किलोमीटरपर्यंत कोणतेही वाहन चालत नाही किंवा येथे प्रदूषण पसरवणारे कोणतेही स्रोत नाहीत. यावरून असा अंदाज बांधता येतो की, या पावसामुळे प्रदूषित शहरात तसेच स्वच्छ शहरातदेखील या पावसामुळे प्रदूषण पसरत आहे. या प्लॅस्टिकचा आपल्या पचनसंस्थेवर आणि प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो. प्लॅस्टिकपासून कर्करोगाचा धोकाही असतो.