
नगर शहरालगत असलेल्या काटवन खंडोबा भागातील गाझीनगरच्या सर्व्हे नंबर 38 (नालेगाव)मध्ये सीना नदीच्या ग्रीन झोनमध्ये बेकायदेशीर लेआउट तयार करून झालेले अनधिकृत बांधकाम लवकरच जमीनदोस्त होणार आहे. याप्रकरणी हरित लवादाने जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व पर्यावरण अधिकाऱयांना नोटीस काढली होती. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱयांनी सीना नदीच्या पात्रात झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी 11 जानेवारी रोजी बैठक घेऊन अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्याची माहिती ऍड. संजय शिरसाठ यांनी दिली.
नालेगाव हद्दीतील गाझीनगर येथील सर्व्हे नंबर 38 च्या क्षेत्राची भूमिअभिलेख यांनी मोजणी करून सर्व्हे नंबर 38च्या मूळ क्षेत्रामध्ये 1.5 एकरची वाढ केल्याबाबत तक्रार आहे. याबाबत जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नगर यांनी यापूर्वी केलेल्या मोजणीची सर्व कागदपत्रे तपासून प्रत्यक्षात सर्व्हे नंबरचे किती क्षेत्र आहे? तसेच या क्षेत्रात मूळ नकाशानुसार किती क्षेत्र होते?, मूळ अभिलेखामध्ये खाडाखोड करून क्षेत्रात दुरुस्ती केलेली आहे की नाही, याबाबत सविस्तर चौकशी करून 15 दिवसांत अहवाल सादर करावा; तसेच मूळ अभिलेखाची तपासणी करून सीना नदीमधील हद्दीत फेरबदल केला आहे काय? याबाबतची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत.
हरित लवादाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार खासगी जमिनीवर विनापरवाना बांधकाम झाले असेल, तर महापालिकेने तत्काळ कारवाई करावी. भोगवटदारांना नोटिसा बजवाव्यात, तरीही भोगवटादाराने कार्यवाही न केल्यास अशा बांधकामांवर कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत.
या सर्व प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे नगरचे ऍड. संजय शिरसाठ यांनी दिल्लीच्या हरित लवादात हे प्रकरण चालवले. हरित लवादाने सर्व पार्टींना नोटिसा बजावून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि नगर महापालिका यामधील प्रत्येकी एक अशा तीन व्यक्तींची संयुक्त समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. समितीला चार आठवडय़ांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.






























































