‘‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाबळेश्वरमधील बाजारपेठेचा सुंदर आराखडा तयार केला होता. हा आराखडा जसाच्या तसा राबविला असता तर महाबळेश्वरच्या पर्यटनात मोठी वाढ झाली असती. तसेच याचा फायदा व्यापाऱ्यांना झाला असता,’’ असे सांगत, आराखड्यात बदल करणे चूक आहे, असे स्पष्ट मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे व्यक्त केले. विरोधी पक्षनेते अजित पवार आज एका कार्यक्रमासाठी महाबळेश्वरमध्ये आले होते. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकारने ज्या ज्या ठिकाणचा नवीन आराखडा तयार केला, तेथे येणारे भाविक आणि पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर असो अथवा शिर्डी येथील साईबाबा मंदिर, या ठिकाणी भाविकांची संख्या दुप्पट झाली आहे. महाबळेश्वर येथील पर्यटनात वाढ व्हावी यासाठीही आम्ही सुंदर आराखडा तयार केला आहे. तो आराखडा राबविला तर येथील पर्यटन अधिक बहरणार आहे. तेच तेच पाहून कंटाळलेल्या पर्यटकांना काहीतरी वेगळे पाहावयास मिळाले असते. हंगामात पर्यटकांना बाजारपेठेतून चालताही येत नाही. दुकाने रस्त्यावर आली आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. मी आणि माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी तयार केलेला आराखडा राबविला जावा यासाठी मुंबईला गेल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे व पालकमत्री शंभूराज देसाई यांची भेट घेणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
महाबळेश्वरप्रमाणेच तापोळा येथेही मोठ्या प्रमाणात पर्यटक यावे, यासाठी 65 कोटींचा तापोळ्याच्या सुशोभिकरणाचा आराखडा तयार केला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील आणि पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी अजित पवार यांचे स्वागत केले. यावेळी श्रीकांत पारठे, सचिन दीक्षित-ढोबळे उपस्थित होते.
वेण्णा लेकची गळती काढण्यास प्राधान्य द्यावे
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज वेण्णा लेकला भेट दिली. यावेळी वेण्णा धरणातील पाणीसाठा खालावल्याचे पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली. या धरणाला गेली अनेक वर्षे गळती सुरू आहे. त्यामुळे या धरणाची उंची वाढविण्यापेक्षा गळती काढण्याला प्राधान्य दिले पाहिजे. गळती काढण्यासाठी आधुनिक उपायांचा वापर करावा; नाहीतर उन्हाळ्यात महाबळेश्वर व पाचगणी शहरांना पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येईल, असे त्यांनी सांगितले.




























































