
आपटी गावात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दापोली तालूक्यातील पहिल्या शाखेचा उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 23 जानेवारी या जयंतीचे औचित्य साधत दापोली येथे 16 जानेवारीपासून भगवा सप्ताह कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यात ठिकठिकाणच्या गावात शिवसैनिकांकडून भगव्या सप्ताहाला मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता दापोलीतील शिवसेना बळकट असल्याचे दिसत आहे. याचे प्रत्यक्ष प्रत्यंतर हे आपटी गावात आले. गुरूवारी 19 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता शिवसेना उपनेते आणि युवासेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल किर्तीकर यांनी आपटी गावातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तालूक्यातील पहिल्याच शाखेच्या उद्घाटनाचा श्रीफळ वाढवून शिवसेना शाखेच्या उद्घाटन केले. त्यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार सुर्यकांत दळवी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई, दापोली विधानसभा संपर्क प्रमुख रूपेश बेलोसे, तालुका संघटक शांताराम पवार, तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालुका सचिव नरेंद्र करमरकर, सह सचिव उमेश शिंदे,महीला आघाडी संघटीका वंदना धोपट, नगराध्यक्ष ममता मोरे, लाजरी पोळेकर,सायली गावडे, सुहास खोकरे, विजय ठोंबरे , सुभाष घडवले, दिलिप तांबे, शाखाप्रमुख दगडू गायकवाड, उप शाखाप्रमुख महादेव भुवड, महिला शाखाप्रमुख किर्ती गायकवाड,उप शाखाप्रमुख तेजस्वी बैकर,महिला संघटक नंदिनी राणे,संतोष बाईत, सुनिल बैकर,बंटी गायकवाड, राजेंद्र गायकवाड,संतोष सावंत, वसंत तांबे,दाजी चांदिवडे, कृष्णा घडवले, विठृठल घडवले, काशिराम पडयाल, शंकर बैकर आदी उपस्थित होते.
आपटी शिवसेना शाखेचे उद्घाटक अमोल किर्तीकर यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिवसेना ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचीच आहे. ठाकरेंशिवाय शिवसेना अपुर्ण आहे. सध्या डयुब्लिकेट शिवसेना आहे त्यांचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही. भविष्यात शिवसेनेला सोडून गेल्याची अवस्था ना घरका ना घाट अशीच होणार असल्याचे ते म्हणाले.
विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई हे मार्गदर्शन करताना म्हणाले की,आजही शिवसेनेवर प्रेम करणारे शिवसैनिक आहेत. आपल्याला लोकांची जनसेवा करायची आहे. 23 जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर आयोजित केलेले आहे. या आरोग्य शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या रोगांच्या व्याधींवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
शिवसेना शाखा उद्घाटन सोहळयात माजी आमदार सुर्यकांत दळवी यांची तोफ आज आपटीत चांगलीच धडाडली. यावेळी ते म्हणाले की, शिवसेना हे आपले दैवत आहे. आपटी हे शूरांचे,विरांचे आणि लढाऊ योध्दयांचे गाव आहे. याच निर्धाराने शिवसेना वाढवा. अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाला तब्बल पंचवीस वर्ष आमदार होण्याचे भाग्य मिळाले ते केवळ शिवसेना या चार अक्षराच्या संघटनेमुळे. मी गेली पंचवीस वर्ष आपली सेवा केली. मी समाधानी आहे. दापोलीत शिवसेना संघटन अधिक भक्कम करावयाचे आहे. कोकण आणि शिवसेना हे एक वेगळ नात आहे. ते जपा असे आवाहन त्यांनी केले.



























































