
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
सुमती (नाव बदलले आहे) आज काहीशी निश्चय करूनच उठली होती आणि स्वयंपाकाचं आटोपत होती. आज तिच्या सासूबाईंना जाऊन सहा महिने होत आले होते. बाथरूममध्ये त्या पाय घसरून पडल्याचं निमित्त काय झालं आणि त्यातच त्या गेल्या.
त्यांचं आजारपण सुमतीच्या घराला जणू आजारपण देऊन गेलं होतं. ती स्वतः, तिचा नवरा अमित (नाव बदलले आहे) आणि सहा वर्षांची मुलगी माही (नाव बदलले आहे) त्यांची काळजी घेतच होते. ‘माझ्या आजीला काही होणार नाही ना’ या काळजीपोटी माही रोज बाप्पाकडे हात जोडत होती आणि शहाण्या मुलीसारखी घरी वागत होती. सुमती तर नुसती टेन्शनमध्येच होती आणि घाबरलेल्या सासूबाईंना ‘‘तू ठणठणीत होशील गं’’ असा केविलवाणा धीर देत होती. त्या दोघींचे नातेही अगदी मोकळे होते. त्यामुळे ती त्यांना ‘‘अगं आई’’ अशाच नावाने हाक मारत असे, पण नियतीच्या मनात शेवटी जे होते तेच झाले. सासूबाई निवर्तल्या आणि त्यांच्यापाठी असलेल्या त्यांच्या मुलाला, सुनेला आणि नातीला पोरकं करून गेल्या.
‘‘आई, आज मला ताप आलाय. मी शाळेत जाणार नाही’’ माहीच्या हाकेने सुमती भानावर आली. ‘‘हो का? आजही शाळेत न जाण्यासाठी तापाचं नाटक आहे काय तुझं?’’ असं म्हणून सुमती माहीवर चिडली. ‘‘आई, आय स्वेअर!’’ माही गळ्याकडे हात नेत म्हणाली, ‘‘हवं तर तू चेक कर. मला बघ थंडी पण वाजतेय.’’ माही जराशी कुडकुडत होतीच. सुमतीने लागलीच थर्मामीटर आणला आणि माहीच्या काखेत तो ठेवून तिच्याकडे रागाने बघायला लागली…‘‘अगदी नॉर्मल टेम्परेचर आहे.’’
‘‘नाही गं’’ असं कळवळतच माही म्हणाली आणि तिला बिलगून मुसमुसायला लागली.
हे रोजचंच झालं होतं. माही शाळेत जाताना रोजच रडायची. सुरुवातीला सुमती आणि अमितने तिला सांभाळून घेतलं, पण रोज शाळा बुडवूनही चालणार नव्हती. सुमती आणि अमितची सकाळ ही माहीच्या ‘‘मला कसंतरी होतंय…बरं वाटत नाही’’ अशा तक्रारींनी सुरू व्हायची. जसजशी शाळेत जायची वेळ जवळ येत जाई तसतशा तिच्या उलटय़ा, सारखं सारखं ‘शी, शू’ सुरू होत असे. माहीचं असं वागणं दोघांनाही त्रासदायक ठरत होतं. शेवटी त्या दोघांनीही समुपदेशनाचा पर्याय स्वीकारला.
‘‘आमच्या माहीचं हे असं आता बरेच महिने चालू आहे, बरं! तिला शाळेत जायचं नसतं असंही नाही. ती तिच्या वर्गात गेल्यावर खूष असते, पण शाळेत जाईपर्यंत तिला काय होतं, माहीत नाही’’ सुमती माहीबद्दल बोलत होती.
माहीला याबाबत विचारले असता तिनेही हे कबूल केले.
‘‘मॅम, मला भीती वाटते’’ माही हळूच म्हणाली. ‘‘कसली?’’ असे विचारले असता ती पटकन उद्गारली, ‘‘आमच्या शाळेत जेव्हा सगळे आम्ही क्लासेसमध्ये जाण्यासाठी जमतो तेव्हा खूप गर्दी असते. मला त्याची भीती वाटते.’’ सुमतीने तेव्हा सहमतीची मान डोलावली.
‘‘आधीही गर्दी होतीच की! तेव्हा माही व्यवस्थित जात होती. आता अचानक काय झालं असावं?’’ अमितने गंभीरपणे विचारलं.
‘‘मला आजीची खूप आठवण येते. आधी ती मला मस्त गाणी शिकवायची. ती गुणगुणत मी जायचे. आता मला कोण शिकवणार?’’ माहीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिला सुमतीने पटकन जवळ घेतलं. ‘‘खरं आहे तिचं. आम्हाला पण आईंचा आधार होता. त्या गेल्या आणि सगळंच बिनसलं’’ सुमती सांगू लागली.
माही ही एका संरक्षक कुटुंबात वाढली होती. तिला काही दुखलं खुपलं की, घरातले सगळे (विशेषतः तिची आजी) धावायचे. तिला एवढंसंही काही लागलं किंवा काही होत असेल तरी सगळ्यांच्या मनाला लागून राहायचं. तिच्या आजीच्या गळ्यातला ती जणू ताईतच होती. आजी कायम तिच्या छोटय़ा मोठय़ा चुकांवर पांघरुण घालायची. शाळेत जाईपर्यंत आणि आल्यावरही तिच्या बरोबर आजीची मस्ती चालायची. आजी गेल्यावर तिची माहीला पोकळी जाणवायला लागली.
‘‘याला सेपरेशन एन्झायटी म्हणतात, पण आपल्याला माहीच्या उrग वरही काम करावे लागेल,’’ असं त्यांना सांगितल्यावर ‘‘म्हणजे?’’ अशी सुमती आणि अमितची प्रतिक्रिया होती.
माही तिच्या कुटुंबामध्ये आईवडील आणि आजीच्या संरक्षण कवचात वाढली असल्याने आणि त्यांच्यामध्येच कायम राहिली असल्याने ती म्हणावी तेवढी तिच्या वयाच्या मुलांएवढी बिनधास्त झालेली नव्हती. गर्दीच्या ठिकाणी, विशेषतः अनोळखी लोकांमध्ये लवकर बावरून जायची, पण घरातील सदस्य तिच्या सोबत असल्यास तिला बावरल्यासारखं व्हायचं नाही. तिला शाळेत सोडण्यासाठी तिची आजी जात होती. त्यामुळे माहीला तिच्या बरोबर सुरक्षित वाटायचे. आता आजी गेल्यानंतर तिला खासगी वाहनातून शाळेत जाणे भाग पडत होते. घरीही तिच्या सोबत आजी जास्त असायची. कारण दोघीही एका खोलीत झोपायच्या. आता ती आजीच्या ‘बेडटाईम स्टोरीज’ मिस करत होती.
असं ‘एकटय़ाने जाणं आणि घरातही आजी खेळायला नसणं’ म्हणजे ‘एकटं असणं’ असं माहीला वाटू लागलं होतं. या नकारात्मक विचारांतून उत्पन्न झालेली भीती आणि असुरक्षिततेची भावना शेवटी तिच्या शरीरावर उलटय़ा, ताप आणि पोट बिघडणे यातून दिसून येत होती. आजीला ती ‘मिस’ करत होतीच. तिच्या आठवणीनेही तिच्या डोळ्यांत लगेच पाणी यायचं.
माहीचं समुपदेशन सुरू झालं. तिला सर्वप्रथम शाळेत जाताना ‘‘कुठली भीती वाटते?’’ असं विचारलं गेलं. तिने ‘‘मला कमी मुलं असतील तर काही वाटत नाही,’’ असं सांगितलं. तिचं बावरलेपण कमी होण्यासाठी तिला तिच्या वर्गमैत्रिणींसोबत शाळेत जाण्याचा पर्याय सुचवण्यात आला. तसंच सुमती आणि तिच्या नवऱयाला तिच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्यास सांगण्यात आले, जेणेकरून तिची एकटेपणाची भावना कमी होणार होती. आजीला तिने पत्रही लिहिले, ज्याद्वारे तिने तिच्या भावनांना मोकळीक दिली.
काही लहान मुलं ही जास्त भावनाप्रधान असतात, पण त्यांना त्यांच्या भावना योग्य शब्दांत मांडता येतीलच असं नाही. मग त्या भावना जर नकारात्मक असतील तर त्या शारीरिक त्रासाद्वारे बाहेर पडू शकतात. ‘असुरक्षिततेची भावना’ ही त्यापैकीच एक. म्हणूनच मुलांना सुरक्षिततेची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्यासाठी ‘क्वॉलिटी टाईम’ काढणे हा सर्वोत्तम उपाय आहे. जो ‘सुसंवादा’ने शक्य होतो. शेवटी गेलेल्या माणसाची पोकळी भरता येणे शक्य नाही. मात्र, त्याच्या सहजसुंदर आठवणी आणि त्याचे नसलेले अस्तित्व मान्य करणे आणि पुढील आयुष्याची सुरुवात करणे कधीही श्रेयस्कर!
हेच सुमती आणि अमितने मान्य केले. शेवटी ते दोघंही तो अनुभव घेत होतेच, पण या सर्व गोष्टी मान्य करून त्यांनी नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली. माहीच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी प्रयत्न करण्यासही सुरुवात केली. ते दोघंही तिच्याशी आता भरपूर गप्पा मारत होते. तिला बेडटाईम स्टोरीज सांगण्याची जबाबदारी अमितेशने स्वतःहून घेतली आणि हो! आता माहीही व्यवस्थित शाळेत जायला लागली होती.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]



























































