
2015 नंतर मंजूर घरकुलाचा पहिला हप्ता घेऊन प्रत्यक्षात कामे सुरू न केलेल्यांचा शोध घेऊन त्यांना गटविकास अधिकाऱयांमार्फत नोटिसा बजावण्यात येत आहेत. जिह्यात असे 2 हजार 987 लाभार्थी आहेत. गेल्या पाच ते सात वर्षांत त्यांनी पहिला हप्ता घेतल्यानंतर प्रत्यक्षात कामे सुरू केलेली नाहीत. विशेष म्हणजे यात 1 हजार 449 लाभार्थी मयत अथवा कायमस्वरूपी स्थालांतरित झालेले आहेत. त्यांच्याकडून मंजूर घरकुलांच्या पहिल्या हप्त्याची रक्कम कशी वसूल करावी, असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनासमोर आहे.
नगर जिल्हा परिषदेच्या सध्याच्या तातडीच्या कामात घरकुल योजनेला प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी गेल्या नोव्हेंबरपासून पुढील शंभर दिवसांचा कार्यक्रमच आखून घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्यात येत आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, गटविकास अधिकारी आणि गावपातळीवर ग्रामसेवक साखळी पद्धतीने काम करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत मंजूर घरकुलांची कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी आधी तालुका पातळीवर, काही ठिकाणी गावपातळीवर दर आठ दिवसाला आढावा घेऊन योजना राबवताना येणाऱया अडचणींवर मात करण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या पाच ते सात वर्षांत घरकुल मंजूर होऊन पहिला हप्ता घेऊन प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात न केलेल्या तालुकानिहाय यादी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने तयार केली आहे. यात जवळपास तीन हजार लाभार्थ्यांची नावे आहेत. या सर्वांना गटविकास अधिकाऱयांमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे. घरकुलाचे काम सुरू करावयाचे नसले, तर घेतलेला पहिला हप्ता शासनाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. मात्र, यात एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. 1 हजार 449 घरकुल लाभार्थ्यांचा शोध लागत नाही. ते एक तर मयत अथवा कायमस्वरूपी स्थालांतरित झालेले आहेत. यामुळे त्यांना दिलेला घरकुलाचा पहिला हप्ता वसूल करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद प्रशासनासमोर आहे.
घरकुल मंजूर होऊन पहिला हप्ता दिलेल्या लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात करावी. कामे सुरू न करणाऱयांची घरकुले रद्द करण्यात प्रशासनाला अजिबात रस नाही. मात्र, कामे मंजूर होऊन त्यापोटी 15 ते 25 हजारांपर्यंतचा पहिला हप्ता घेऊन काम करणार नसेल, तर दिलेले अनुदान वसूल करावेच लागेल, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे म्हणणे आहे.
असे आहेत लाभार्थी कंसात (मयत अथवा स्थलांतरित)
अकोले 363 (190), जामखेड 181 (54), कर्जत 341 (254), कोपरगाव 227 (34), नगर 87 (22), नेवासा 256 (149), पारनेर 100 (33), पाथर्डी 376 (182), राहाता 76 (182), राहुरी 240 (65), संगमनेर 132 (46), शेवगाव 263 (153), श्रीगोंदा 275 (11) आणि श्रीरामपूर 70 (224) – एकूण 2 हजार 987 (1 हजार 449).




























































