
स्क्रॅप विक्रेत्या व्यावसायिकाचे अपहरण करीत त्याला मारहाण करून ऑनलाईन 1 लाख 68 हजारांवर खंडणी उकळणार्या सराईतासह दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. एजाज चौधरी (वय 36) आणि जावेद शेख (वय 28) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मोसीन जमालुद्दीन खान (27, रा. जाधववाडी, मुळशी रोड, पिंपरी चिंचवड) यांनी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार मोसीन आणि आरोपी एजाज चौधरी नातेवाईक असून त्यांचा काचेचा स्क्रॅप विक्रीचा व्यवसाय आहे. हिशोबावरून त्यांच्यात वाद असल्यामुळे आरोपींनी चौधरीला 26 डिसेंबरला मगरपट्टा परिसरातील कालीका डेअरीच्या बाजुला बोलवून घेतले. त्यानंतर तीन आरोपींनी त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून येरवड्यात नेत मारहाण केली. आरोपी मोसीनने त्यांच्या गळ्याला शस्त्र लावत 1 लाख 65 हजारांची मागणी केली. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी देत ऑनलाईनरित्या 1 लाख 68 हजार पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी चौधरी यांना सोडून दिले. काही दिवसांनी आरोपींनी पुन्हा त्यांना 10 हजारांची मागणी केली. त्यामुळे चौधरी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली. याप्रकरणी तिघांवर अपहरण, खंडणी मागणे, खंडणी उकळणे, कोयत्याचा धाक दाखविणे, संगनमताने धमकावणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक संतोष डांगे तपास करीत आहेत.


























































