रणजीचे नॉकआऊट आजपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या राष्ट्रीय क्रिकेटचा आत्मा असलेल्या रणजी करंडकाच्या नॉकआऊट अर्थातच उपांत्यपूर्व फेरीला मंगळवारपासून प्रारंभ होत असून बंगाल विरुद्ध झारखंड, कर्नाटक विरुद्ध उत्तराखंड, पंजाब विरुद्ध सौराष्ट्र आणि मध्य प्रदेश विरुद्ध आंध्र प्रदेश अशा लढती रंगतील. चारही गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीत दाखल झाले आहेत. उद्यापासून सुरू होत असलेल्या लढतीत प्रत्येक संघ पहिल्या डावातील आघाडी आणि निर्णायक विजयासाठी संघर्ष करताना दिसेल. त्यामुळे लढती जोरदार होणार.

यंदा उपांत्यपूर्व फेरीत खेळत असलेल्या आठ संघांपैकी उत्तराखंड, झारखंड आणि आंध्र प्रदेश या संघांना कधीही रणजी करंडक जिंकता आलेले नाही. त्यामुळे हे तिन्ही संघ आपापले सामने जिंकून उपांत्य फेरी गाठण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील, यात शंका नाही. झारखंडचा संघ बंगालविरुद्ध खेळणार असून ईडन गार्डनवर रंगणाऱया या लढतीत बंगालला हरवणे, त्यांच्यासाठी नक्कीच सोप्पे नसणार. झारखंडची फलंदाजी सौरभ तिवारीवर अवलंबून आहे तर बंगालसाठी ईश्वरन, अनुस्तुप मजुमदार, सुदीप घरामी सातत्याने खेळताहेत. बंगालकडून आकाशदीप आणि पोरेलने अप्रतिम मारा केलाय. त्यांच्या गोलंदाजीची धार ईडनवरही दिसू शकते.

कर्नाटक आणि उत्तराखंड चिन्नास्वामीवर भिडतील. साहजिकच कर्नाटकचे पारडे जड असले तरी उत्तराखंडची स्पर्धेतील कामगिरी भन्नाट आहे. त्यांचा संघ स्पर्धेत अद्याप अपराजित आहे. मयांक मिश्राच्या गोलंदाजीचा धसका सर्वानीच घेतलाय. फलंदाजीत कुणाल चंडेलाची बॅट सातत्याने तळपलीय. या फॉर्मातले खेळाडू कर्नाटकसमोर नक्कीच आव्हान ठेवतील.

पंजाब आणि सौराष्ट्रनेही आपापल्या गटात दमदार खेळ केलाय. पंजाबचा संघही स्पर्धेत अपराजित आहे तर सौराष्ट्रने मुंबई, दिल्लीसारख्या संघांवर निर्णायक विजय नोंदवत इथपर्यंत मजल मारलीय. गेली काही वर्षे सौराष्ट्र वारंवार बाद फेरीत पोहोचतोय. यंदाही त्यांचे पहिले लक्ष्य उपांत्य फेरी असेल. पंजाबने आपली एकमेव रणजी स्पर्धा जिंकून आता 30 वर्षे उलटलीय. या वेळी त्यांना पुन्हा तोच करिश्मा करून दाखवायचाय. लक्ष्य एकच असल्यामुळे लढत रंगणारच.

 मध्य प्रदेश जेतेपद राखण्यासाठी सज्ज

गतविजेता मध्य प्रदेश यंदाही सुपर फॉर्मात आहे. मोसमात साखळीत सर्वाधिक पाच विजय त्यांनीच नोंदवले आहेत. मध्य प्रदेशने गेल्याच वर्षी आपल्या कारकिर्दीतील पहिले जेतेपद पटकावले होते. आता ते राखण्यासाठी सज्ज झालेत. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रांत मध्य प्रदेशची कामगिरी जोरदार होतेय. त्यांची गाठ एकदाही अंतिम सामन्यापर्यंत न पोहोचलेल्या आंध्र प्रदेशशी होतेय. आंध्रने मुंबई–महाराष्ट्रसारख्या तगडय़ा संघांना मागे टाकून हा पल्ला गाठलाय. त्यांना आपल्या रणजी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करण्याची सुवर्णसंधी मिळालीय. फक्त या वेळी त्यांनी त्याचे सोने करायला हवे.