विलेपार्ल्यात झाड पडून सोसायटीची भिंत कोसळली, रहिवाशांच्या मदतीसाठी शिवसैनिक धावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विलेपार्ले पूर्व येथे भलेमोठे झाड पडून सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. सोसायटीच्या मागील बाजूला ही घटना घडल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिवसैनिक तत्काळ घटनास्थळी मदतकार्यासाठी पोहोचले. पहाटेपर्यंत झाड बाजूला हटवण्याचे काम सुरू होते.

विलेपार्ले पूर्व तेजपाल स्कीम येथे अंबा भुवन, सुभाष निकेतन आणि अयोध्या निवास या तीन जुन्या इमारती आहेत. गुरुवारी रात्री सोसायटीच्या आवारातील भलेमोठे झाड अचानक पडल्याने सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख प्रकाश सपकाळ, उपशाखाप्रमुख नितेश गुरव, युवासेनेचे आनंद पाठक, भाई पालव, विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांच्यासह शिवसैनिक तेथे मदतकार्यासाठी पोहोचले. शिवसैनिकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या सहकार्याने सोसायटीतील धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात आली. त्याबद्दल रहिवाशांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.