चेंबूरमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई, मैदान, विकासकामांचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूरमधील जिजामाता नगरात आरक्षित भूखंडावर बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेल्या 32 बांधकामांवर पालिकेने बुलडोझर फिरवल्याने या ठिकाणी आता खेळाचे मैदान आणि इतर आरक्षित विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘एम/पश्चिम’ विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे 5 हजार चौरस मीटर मोकळी जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे.

पालिकेच्या एम पश्चिम विभागाअंतर्गत, चेंबूरमध्ये जिजामाता नगर परिसरात सीटीएस क्रमांक 214अ/1, 214अ/2, 214बी, 220 आणि 222 हे विकास नियोजन आराखडा 2034 नुसार खेळाच्या मैदानासह विविध उपयोगासाठी आरक्षित आहेत. मात्र या ठिकाणच्या सुमारे 5 हजार चौरस मीटर क्षेत्राच्या या भूखंडांवर वेगवेगळ्या प्रकारची अतिक्रमित बांधकामे करण्यात आली होती. त्यामुळे किकास आराखडय़ानुसार आरक्षित कारणासाठी या जागेचा वापर करणे कठीण बनले होते. या पार्श्वभूमीवर परिमंडळ – 5चे उप आयुक्त हर्षद काळे, एम पश्चिम विभाग सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी एम पश्चिम विभाग कार्यालयाचे 13 अभियंता, वेगवेगळ्या खात्यांचे 17 कर्मचारी, 52 कामगार आणि 1 पोकलेन, 3 जेसीबी, 3 डंपर, मेसर्स अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचे कर्मचारी यांनी ही कारवा केली. या कारवाईदरम्यान, ‘आरसीएफ’ पोलीस ठाण्याने पोलीस बंदोबस्त पुरवला.