
मध्य रेल्वे आणि पोस्टाने संयुक्तपणे ‘रेल्वे-पोस्ट गती शक्ती एक्प्रेस’ अंतर्गत उत्पादन पार्सल सेवा सुरू केली आहे. त्यानुसार पहिली पार्सल गाडी उद्या, सोमवारपासून मध्य रेल्वेच्या भिवंडी स्थानकातून सुटणार असून बुधवारी दुपारी 4 वाजता हावडा गुड्स टर्मिनस येथे पोहचणार आहे.
नागरिकांना देशाच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पार्सल पाठवता यावे म्हणून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आणि पोस्टाने हातमिळवणी केली आहे. भिवंडी बिझनेस डेव्हलपमेंट युनिट येथून दर सोमवारी सुटणारी ही पंधरा डब्यांची साप्ताहिक पार्सल व्हॅन सेवा असेल. उद्या रात्री 10 वाजता सुटणारी पहिली सेवा भिवंडी येथून सुटणार आहे. या पार्सल व्हॅनला इगतपुरी, भुसावळ, बडनेरा, नागपूर, इतवारी आणि झारसुगुडा येथे थांबा असणार आहे. भिवंडी येथून देशभरात मोठय़ा प्रमाणात पार्सल पाठवली जातात. एप्रिलपासून दहा महिन्यांच्या कालावधीत भिवंडी रोड व्यवसाय विकास युनिटने 19 लाख 34 हजार पॅकेजेसमधून 24 हजार 728 टनाचे पार्सल पाठवले आहे.
























































