
थंडीने काढता पाय घेतला की, वसंत ऋतूची चाहुल लागते. वसंत ऋतू म्हणजे नवोन्मेषाची चाहुल. याच काळात पानगळ संपते आणि वृक्षवल्ली नवीन पालवी धारण करतात. वसंत पंचमीपासून निसर्गाचा हा उत्सव सुरू होतो. या काळात थंडीचा कडाका कमी होतो आणि उन्हाची तीव्रता वाढते, पण यंदा उलटेच झाले आहे. फेब्रुवारीतच उन्हाचे चटके बसत आहेत. देशाच्या अनेक राज्यांत पारा ४० अंशांवर गेला असून ‘वंसत’ जणू गायबच झाला आहे!
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हिंदुस्थानात माघ आणि फाल्गून या महिन्यांत वसंत ऋतू असतो. ग्रेगरी कालदर्शिकेप्रमाणे फेब्रुवारीचा उत्तरार्ध आणि मार्च महिन्यात वसंत ऋतू येतो. काहींच्या मते, चैत्र आणि वैशाख हे वसंत ऋतूचे महिने. हिंदुस्थानात साधारण वसंत पंचमी म्हणजे माघ शुद्ध पंचमीपासून वसंत ऋतूचा आरंभ होतो. इंग्रजीत याला स्प्रिंग असे म्हणतात. शिशिर ऋतूत सुरू झालेली पानगळ संपून वृक्षवल्ली नवता धारण करतात. झाडवेली नव्या पालवीने बहरून जातात. वसंत सृष्टीचे यौवन आहे, असे काव्यात्म वर्णनही या ऋतूचे केले जाते, ते याचमुळे!
यंदा मात्र मार्चमध्ये जाणवणारी उष्णता फेब्रुवारीतच जाणवत आहे. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशात तापमान 35 ते 40 अंशांवर गेले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशाचे सरासरी तापमान सध्या 15 मार्चला जसे असते तसेच आहे. पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्येही तापमान वाढण्याची शक्यता आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानात सध्या २० अंशांची तफावत आहे. त्यामुळे वसंत ऋतूचा आगमनाचा मागमूसही कुठे दिसत नाही.
तापमानात चढ-उतार होत असल्यामुळे देशात विषाणुजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. थंडी, ताप यांसारखे आजार बळावळे आहेत. त्याचबरोबर हवेत धुलीकणांचे प्रमाण वाढल्याने खोकल्याचे रुग्णही वाढले आहेत. आश्चर्यकारक म्हणजे खोकल्याच्या मुदतीत यंदा वाढ दिसून येत आहे. साधारण खोकला 8 दिवसांच्या मुदतीत बरा होतो. परंतु, यंदा दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकल्याचा त्रास जाणवत आहे.




























































