
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक प्रचाराच्या तोफा अखेर आज सायंकाळी थंडावल्या. आता रविवारी दोन्ही मतदारसंघांत मतदान पार पडणार आहे. या दोन्ही मतदारसंघांत जोरदार प्रचार पार पडला. भाजपसह महाविकास आघाडीच्या सर्व दिग्गज नेत्यांनी सभा घेऊन प्रचाराची राळ उडविली. सुरुवातीला साध्या वाटणाऱ्या या पोटनिवडणुका अटीतटीच्या आणि राजकीयदृष्टय़ा अत्यंत प्रतिष्ठेच्या झाल्याने या दोन्ही पोटनिवडणुकांनी भाजपची धाकधूक वाढली आहे. रविवारी मतदान पार पडणार असून गुरुवारी मतमोजणी होणार आहे.
शिंदेंच्या रॅलीत ‘गद्दार’च्या घोषणा
कसबा पेठ पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘रोड शो’ मध्ये ‘आले रे आले, गद्दार आले’, या घोषणांचा सामना करावा लागला. यामुळे एकच गोंधळ उडाला. शिंदे यांना ‘गद्दार’ म्हणून प्रचारातही लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याने भाजपची प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पंचाईत झाली. पोलिसांनी ‘आले रे आले, गद्दार आले’ अशा घोषणा देणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब ताब्यात घेतले. मात्र, त्या व्यक्तीचा तपशील पोलिसांकडून सांगण्यात आला नाही.
महाराष्ट्राच्या इतिहासात ‘असं’ कधी झालं नव्हतं
महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या पोटनिवडणुका झाल्या; परंतु कधी राज्याचे मुख्यमंत्री रोड शोच्या निमित्ताने फिरत नव्हते, पण या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री रस्त्यावर फिरले हे महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदेंना लगावला. पोटनिवडणूक एकतर्फी असून बिनविरोध करा, असे भाजपवाले म्हणत होते, परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी ठाण मांडले आहे. ही निवडणूक एकतर्फी राहिली नसून चुरशीची झाल्याचे द्योतक आहे, असेही अजित पवार म्हणाले.
कसब्यात भाजपने टिळक कुटुंबीयांतील व्यक्तीला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीने काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे, तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे नाना काटे विरुद्ध भाजपच्या अश्विनी जगताप अशी लढत आहे.

























































