भाजप आमदाराकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक, सभागृहात माफी… माफीच्या घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. सातपुते यांनी एकेरी उल्लेख केला आहे तेव्हा माफी मागितल्याशिवाय आम्ही ऐकणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मांडली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी यासंदर्भात भूमिका मांडली. पण दोन्ही बाजूंनी गोंधळ सुरू होता. अखेर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली. अखेर सातपुते यांनी सभागृहात माफी मागितली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झालं.

आमदार सातपुते यांनी बोलताना शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले. त्यांनी माफी माफी अशा घोषणा देत मागणी केली. विधानसभेच्या अध्यक्षांनी मी रेकॉर्ड तपासतो असं आश्वासन दिलं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना ही भूमिका पटली नाही. त्यांनी पहिले सातपुते यांनी माफी मागितली पाहिजे अशी भूमिका घेतली. माफी… माफी… अशा घोषणा कायम सुरू ठेवल्या… अध्यक्षांची भूमिका मान्य नसल्यानं राष्ट्रवादीच्या आमदारांनी घोषणा सुरूच राहिल्या. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. ‘सभागृहात कुणाच्याही वरिष्ठ नेत्याचा अवमान होईल असे विधान करू नये. रेकॉर्ड तपासून मग विधान वगळू यात वेळ जातो, ते कराच. मात्र त्या आधी माफी मागितली पाहिजे. चुकीचे पायंडे पाडू नका. नाही तर मग विरोधीपक्षही अशीच भूमिका घेईल. तेव्हा चुकीचे पायंडे पाडू नका असं म्हटलं. पण मी देखील अनेकदा माफी मागून पुढे जात राहिलो आहे. तेव्हा आधी माफी मागितली पाहिजे’, असं ते म्हणाले.

त्यानंतर देखील अध्यक्षांनी रेकॉर्ड तपासून मग ते विधान काढून टाकू असं म्हटलं. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा आक्रमक झाले. अखेर भाजपकडून आशिष शेलार उभे राहिले आणि त्यांनी सातपुते यांना माफी मागावी, अशी विनंती केली. त्यानंतर सातपुते यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि सभागृहाचे कामकाज पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाले.