
भाजपचे आमदार राम सातपुते यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी आज विधानसभा डोक्यावर घेतली. ‘माफी…माफी…माफी…’ अशा जोरदार घोषणा त्यांनी दिल्या. सातपुते यांनी माफी मागितल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे आमदार सातपुते यांना सभागृहात दिलगिरी व्यक्त केल्यानंतर कामकाज पूर्ववत सुरू झाले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी सनातन हिंदू धर्माबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर हा प्रकार घडला. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आमदारांनी सभागृहात हिंदू धर्माचा जयजयकार सुरू केला आणि त्यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. तालिका सभापती योगेश सागर यांनी वक्तव्य पडताळून कार्यवाही केली जाईल असे सांगितले.
यावेळी आव्हाड यांनी घोषणाबाजी करणारे भाजप आमदार राम सातपुते यांना उद्देशून बोलताच त्यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार भडकले. त्यांनी सातपुते यांनी माफी मागावी अशी मागणी केली. यावेळी झालेल्या गोंधळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज काही काळ तहकूब करावे लागले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यावेळी म्हणाले, प्रत्येकाला आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याबद्दल अभिमान असतो. त्यांचा एकेरी उल्लेख सहन केला गेला तर सभागृहात वेगळा पायंडा पडेल, असे ते म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही त्याला सहमती दर्शवून सभागृहाच्या कामकाज तपासून आक्षेपार्ह विधाने काढून टाकली जातील, असे सांगितले. भाजप आमदार आशीष शेलार यांनी भाजपच्या वतीने आपण दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले, मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांचे त्याने समाधान झाले नाही. अखेर आमदार सातपुते यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला आणि कामकाज पूर्ववत सुरू झाले.


























































