
जनतेच्या कामासाठी सातत्याने खेटा घालूनही विद्यमान सरकारकडून ती केली जात नाहीत. विरोधकांशी सुडाने वागू नका, विरोधकांच्या मतदारसंघातील विकासकामे हेतुपुरस्पर रोखू नका, अशा शब्दांत आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट शब्दांत खडसावले. तुम्ही कितीही चौकशा मागे लावा, जेलमध्ये टाका, मतदारसंघातील विकामकामे रोखा, काहीही करा मात्र मी गुडघे टेकणार नाही हे लक्षात ठेवा, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील प्रस्तावावर बोलताना भास्कर जाधव यांनी आपल्या आक्रमक शैलीत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला खडे बोल सुनावले. जाधव पुढे म्हणाले की, संसदेत कधी काळी भाजपचे दोनच खासदार होते. शिवसेनेमुळे माझाही काळ मोठय़ा प्रमाणावर विरोधी पक्षातच गेला आहे, मात्र यापूर्वी कधीही इतक्या सुडाने विरोधी पक्षातील आमदारांशी वागण्यात आले नव्हते. उलट ज्या काँग्रेsसची देशात, राज्यात सत्ता होती त्या काँग्रेसचे मंत्रीही विरोधी पक्षाचा आमदार भेटायला गेला तर जागेवरून उठून उभे राहायचे आणि विरोधकांची कामे करून द्यायचे. मात्र आता राज्यात सत्तेत असलेली मंडळी जाणूनबुजून सुडाने वागत आहेत, अशी टीका त्यांनी केली.























































