दादर स्थानकातील प्रवाशांची कोंडी फुटणार, मध्य रेल्वे एक नंबर प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गर्दीने ओसांडून वाहणाऱया दादर स्थानकातील प्रवाशांची कोंडी लवकरच फुटणार आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांकावर एक आणि दोनवर दिवसभर मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना चालणे कठीण होत असून अनेकदा सर्वात मोठय़ा पुलाच्या शिडीवर प्रवाशांच्या गर्दीचा लोंढा जातो. त्या पार्श्वभूमीवर येथील गर्दी कमी करण्याबरोबरच प्रवाशांना दोन्ही प्लॅटफॉर्मवर जास्त जागा उपलब्ध व्हावी म्हणून एक नंबरच्या प्लॅटफॉर्मची रुंदी दोन मीटरने वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असल्याचे रेल्वेच्या मुंबई विभागाचे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी सांगितले.

उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने दादर मध्यवर्ती स्थानक असून मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारे मोठे स्थानक आहे. तसेच येथून अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटत असल्याने येथे नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. मध्य रेल्वेने ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन या एकमेकांना लागून असलेल्या प्लॅटफॉर्मवर उतरावे लागते, मात्र येथे येणाऱया प्रवाशांच्या गर्दीचा विचार करता प्लॅटफॉर्म अरुंद ठरत आहेत.

स्वयंचलित जिना बसवणार

गर्दीच्या वेळी स्थानकातील मोठय़ा पादचारी पुलावरून मोठय़ा प्रमाणात प्रवासी प्लॅटफॉर्म एक-दोनवर उतरतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडून धीम्या गाडीने आलेल्या प्रवाशांना पुलावर चढताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे येथे एक स्वयंचलित जिना बसवण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानकाच्या मास्टर प्लॅनमध्ये आवश्यक बदल करावे लागणार आहेत. त्याला मंजुरी मिळताच प्रत्यक्ष काम सुरू केले जाणार असल्याचे रजनीश गोयल यांनी स्पष्ट केले.

– येथे मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असल्याने दिवसभर गर्दी नियंत्रणासाठी पोलीस तैनात करावे लागतात. त्यामुळे प्लॅटफॉर्मची रुंदी वाढल्यानंतर पोलिसांवरील ताण कमी होऊ शकणार आहे.