
कर्नाटक भाजपचे नेता के. एस. ईश्वरप्पा यांनी अजानविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं आहे. एका जाहीर सभेत हे विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. भोंग्याच्या कर्कश्य आवाजामुळे आपल्याला डोकेदुखी होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
सोमवारी ईश्वरप्पा हे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यावेळी अचानक शेजारील मशिदीवरून अजानचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्यांनी अजानवर भाषण करायला सुरुवात केली. ते म्हणाले की, अजानसाठी भोंगे वाजवल्यावरच अल्ला ऐकणार आहे का? मंदिरातही महिला आणि मुली प्रार्थना-भजन करतात पण त्यांना कधीच लाउडस्पीकर लागत नाही. हिंदू लोकही मंदिरात प्रार्थना करतात, श्लोक आणि भजनं गातात. आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक धार्मिक आहोत. ही भारतमाता आहे, जी धर्मांचं रक्षण करते. पण, प्रार्थना किंवा अजानसाठी जर भोंगे लागत असतील याचा अर्थ अल्ला बहिरा आहे का?, असं वक्तव्य ईश्वरप्पा यांनी केलं आहे. या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.
ते पुढे म्हणाले की, मी जिथे कुठे जातो तिथे भोंग्यांमुळे मला डोकेदुखी होते. हे सगळं लवकरच संपेल याची मला खात्री आहे. कारण लवकरच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल. पंतप्रधान मोदी आम्हाला सगळ्या धर्मांचा आदर करायला सांगतात, असंही ईश्वरप्पा यावेळी म्हणाले.




























































