आमच्या कुटुंबाकडे सहा वर्षात किती संपत्ती सापडली; तेजस्वी यादव यांचा संतप्त सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेत जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणावरून अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) गेल्या आठवड्यात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरी छापेमारी केली. तसेच, देशातील लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाशी संबंधित 24 ठिकाणांवर ईडीने छापे टाकले होते. त्यात काही रक्कम, सोन्याचे दागिने आणि परकीय चलन ईडीने जप्त केले होते. याप्रकरणावर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपवर टीका केली आहे.

तेजस्वी यादव म्हणाले, सरकार बनल्यानंतरही आमच्यावर छापे पडले होते. घटनाक्रम समजून घ्या. जेव्हा सरकार बनलं आणि विश्वासदर्शक ठराव मांडला जात होता, तेव्हाही छापे पडले. त्या छाप्यांचं काय झालं? किती मिळाले 100 कोटी, 1 हजार कोटी, याचे उत्तर भाजपने द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

2017 साली आमच्या कुटुंबाजवळ 1 हजार कोटी रूपयांची संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला. त्याप्रकरणात आयकर विभाग, ईडी आणि सीबीआयने तपास केला. आज 2023 साल आहे. मागील सहा वर्षात या संपत्तीच्या तपासाचे काय झाल?, आमच्याकडे किती संपत्ती सापडली, असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला आहे.

भाजपने आपला लेखक बदलला पाहिजे. कारण, सातत्याने एकच वक्तव्य करण्यात येते. त्यात काहीही बदल नाही. आता 600 कोटी रूपयांची रक्कम तेजस्वी यादव यांच्या घरी मिळाली असे सांगतात. मी म्हणतो ठेंगा मिळाला आहे, त्यांना काहीही मिळाले नाही, असे तेजस्वी यादव म्हणाले. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावरही तेजस्वी यादव यांनी टीका केली आहे. तपास यंत्रणांनी 24 ठिकाणी छापेमारी केली. या ठिकाणी तपास यंत्रणांना जेवढी रक्कम मिळाली नाही, तेवढी बेहिशोबी रक्कम गिरिराज सिंह यांच्या घरी मिळाली होती. कर्नाटकातील भाजपा आमदाराच्या घरी 8 कोटी सापडले. आयकर विभाग, सीबीआय आणि ईडी तिथे का नाही गेली, असा सवालही तेजस्वी यादव यांनी केला आहे.