
महाराष्ट्र शासनाने 2014 मध्ये केंद्र सरकारकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव सादर केला असून, यावर समिती नेमण्याचीही मागणी करण्यात आली आहे. हा प्रस्ताव सादर होऊन 9 वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही कोणतीच कार्यवाही झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारमध्ये अनास्था असल्याचे दिसून येत आहे.
सध्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान खासदार श्रीनिवास पाटील यांनी मराठी भाषेला दर्जा मिळण्याबाबत राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला आहे, त्यावर जी समिती नेमण्यात आली आहे, त्या समितीच्या किती बैठका झाल्या? असा तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर समितीची अद्यापि एकही बैठक झाली नसल्याचे उत्तर केंद्रीय सांस्कृतिकमंत्री जी. किशन रेड्डी यांनी खासदार पाटील यांना पाठवले आहे.
2014 मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून 2015 मध्ये अभिजात दर्जा देण्याबाबत चर्चाविनिमय करण्यासाठी भाषातज्ञांची एक समिती नेमण्यात आली आहे. परंतु यातील अजून काही जागा रिक्त आहेत, तर काही जण मृत झाले आहेत. समिती नेमल्यानंतर अजून कोणतीही बैठक झाली नसल्याचे केंद्राकडून आलेल्या उत्तरात म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारने याबाबत 9 वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठवला होता. तसेच, विविध साहित्यिक, संघटना व संस्थांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आंदोलने केली व मोर्चे काढले. तसेच, पंतप्रधान यांना लाखोंच्या संख्येने पत्रेही पाठवली. यानंतरही केंद्राने कोणतीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारच मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. अभिजात दर्जाबाबत नेमलेल्या समितीची बैठकच न होणे हे क्लेशदायक आहे. यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी म्हटले आहे.






























































