विद्यार्थी संच मान्यतेनुसार शिक्षकांच्या पदांना मंजुरी, आधारकार्ड लिंक नसल्याचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांचे आधारकार्ड शालार्थ प्रणालीशी लिंक नसल्याचा फटका विद्यार्थी तसेच शिक्षकांनाही बसणार आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षातील संच मान्यता ही आधार लिंक आणि प्रमाणित झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तालयाने दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थी संच मान्यतेनुसारच शिक्षकांच्या पदांना मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे शाळांतील आधार लिंक नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यास त्याचा फटका शिक्षकांना बसण्याची शक्यता आहे.

वेतन अनुदानास पात्र शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांना 31 मार्चपूर्वी पगार देणे आवश्यक आहे. त्यासाठी वर्ष 2022-23 ची संच मान्यता आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. सध्या आधार लिंक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन ऑनलाइन अंतरिम संच मान्यता करावी. या संच मान्यतेनुसार मंजूर होणाऱया पदांना 31 मार्चपूर्वी पगार देण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असेही मांढरे यांनी म्हटले आहे. तसेच 30 एप्रिलपर्यंत आधार लिंक होणाऱया विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन सुधारित व अंतिम संच मान्यता करावी. अंतिम संच मान्यतेमध्ये मंजूर झालेल्या पदांना पुढे ऑनलाइन प्रणालीमधून जानेवारी 2023 पासूनचा पगार देण्यात यावा, असेही मांढरे यांनी सांगितले आहे.

शिक्षण आयुक्तांच्या या निर्णयामुळे संच मान्यतेच्या नावाखाली आतापर्यंत चालढकल करणाऱया शाळांची मोठी गोची होणार आहे. राज्यातील असंख्य शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणित करण्याच्या प्रकरणावरून गोंधळ सुरू आहे, तर दुसरीकडे विभागाने विद्यार्थ्यांच्या आधारचा आधार घेऊन संच मान्यता आणि त्यातून निर्माण होणाऱया पदांचेच वेतन काढण्याची भूमिका घेतल्याने अनेक अनुदानित संस्था चालकांचे धाबे दणाणले आहेत.