
ईस्टर्न फ्रीवेवर (पूर्व उन्नत मार्ग) आता प्रवास खड्डेमुक्त आणि सुखकर होणार आहे. या रस्त्याची दुरुस्ती, डागडुजी करण्यासाठी पालिका 24 कोटी 41 लाखांचा खर्च करणार आहे. या कामात मस्जिद बंदर येथील पी. डिमेलो रोड ते या मार्गाचे शेवटचे टोक असलेल्या घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडपर्यंत काम केले जाणार आहे. एमएमआरडीएने सन 2010 मध्ये पी डिमेलो रोड ते मानखुर्द/ गोवंडीदरम्यान 16.8 किमीचा फ्री वे मार्ग बांधला. 2015 मध्ये हा मार्ग देखभालीसाठी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या मार्गामुळे मस्जिद बंदर ते मानखुर्द हा विनासिग्नल प्रवास अवघ्या 20 ते 25 मिनिटांत होऊ लागला आहे. या कामासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत.






























































