लोकल प्रवाशांचे पुलावरील वेटिंग संपणार! मोबाईलवर एका क्लिकवर कळणार लोकल कधी, कोणत्या फलाटावर येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेच्या जलद लोकलने प्रवास करणाऱया प्रवाशांचे पुलावरील वेटिंग आता संपणार आहे. जलद मार्गावरील लोकल कोणत्या फलाटावर येणार याबाबत कधीच निश्चितता नसते. अनेकदा एका फलाटावरील इंडिकेटरवर दिसणारी गाडी दुसऱ्या फलाटावर येते. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी एका फलाटावरून दुसऱया फलाटवर धावपळ करावी लागते. नेहमीचीच ही धावपळ आता थांबणार असून लोकल कधी आणि कोणत्या फलाटावर येणार हे आता मोबाईल एका क्लिकवर समजणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना लोकल गाडय़ांचे लाईव्ह लोकेशन समजावे म्हणून सीडीपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने आजपासून ‘यात्री’ ऍप सुरू केले आहे. या ऍपच्या माध्यमातून उपनगरीय मार्गावर धावणारी लोकल गाडी कुठे आहे, ती कोणत्या फलाटावर येईल, यायला किती वेळ आहे, काही कारणास्तव गाडीला उशीर होणार असेल तर त्याचीही माहिती ‘यात्री’ ऍपद्वारे समजणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या दादर, अंधेरी, बोरिवली, वसई, नालासोपारा या गर्दीच्या स्थानकात जलद अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाडय़ा ऐनवेळी एका फलाटाऐवजी दुसऱया फलाटावर येत असल्यामुळे प्रवाशांना मोठी धावाधाव करावी लागते. पण ही जीवघेणी प्रतीक्षा आता संपणार असून कोणती गाडी कुठल्या फलाटावर येणार हे समजणार असल्यामुळे प्रवाशांना सहजपणे गाडी पकडता येणार आहे.

या स्थानकात होते धावाधाव
दादर, अंधेरी, बोरिवली, वसई, नालासोपारा या स्थानकांमध्ये प्रवाशांची धावाधाव होते. सायंकाळी दादर-विरार ही जलद गाडी दादर स्थानकातून कधी फलाट क्र. 5 वरून तर कधी 6 वरून सुटते. विरारकडून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱया जलद गाडय़ा अंधेरी स्थानकात फलाट क्र. 5 किंवा 7 वर येते, बोरिवली स्थानकात 4 किंवा 6 क्रमांकाच्या फलाटावर येतात. वसई स्थानकात 4 किंवा 6 आणि नालासोपारा स्थानकात 2 किंवा 4 क्रमांकाच्या फलाटावर येत असल्याने प्रवाशांना नेहमीच धावाधाव करावी लागते.

लोकलच्या बदलाचे नोटीफिकेशन येणार
उपनगरीय लोकल मार्गावर अनेक प्रवासी दररोज ठरलेल्या एकाच लोकल गाडीने प्रवास करतात. त्यांनी ‘यात्री’ ऍपमध्ये सदर लोकलला फेवरेट म्हणून मार्क केल्यास त्या लोकलच्या वेळेत होणारे सर्व बदल संबंधित प्रवाशाला नोटीफिकेशनच्या माध्यमातून कळणार असल्याचे सीडीपी इंडियाने स्पष्ट केले आहे.