
कार, मोबाईल, फ्रीज, कूलर ‘ईएमआय’वर मिळतो हे काही नवीन राहिले नाही; पण फळांचा राजा आंबा ‘ईएमआय’वर मिळू लागला तर… ‘पुणे तिथे काय उणे’ या उक्तीनुसार एका पुणेरी व्यापाऱ्याने ही भन्नाट आयडिया आणली आहे. सर्वसामान्यांना हापूस आंब्याची चव चाखता यावी यासाठी सुलभ हप्त्यांवर हा आंबा मिळेल.
अवकाळी पावसाने आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. एकतर बाजारात माल कमी आल्याने आंब्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यांच्यासाठी ही गोड बातमी.
सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे. बाजारात विविध प्रकारचे आंबे मिळत असले तरी देवगड आणि रत्नागिरी हापूसची चव चाखावी असे सर्वांनाच वाटते. किरकोळ बाजारात हापूस आंब्याचे दर 800 ते 1300 रुपये प्रति डझनवर आहेत. सर्वसामान्यांना परवडणारे हे दर नाहीत. त्यामुळे पुण्यातील गुरुकृपा ट्रेडर्स ऍण्ड फ्रूट प्रॉडक्ट्सचे गौरव सणस यांनी ‘ईएमआय’ योजना आणली. आधी खा, मग पैसे भरा या सुलभ हप्त्यांवर आंबा उपलब्ध करून देणारी देशातील ही पहिली योजना असल्याचा दावा सणस यांनी केला.
तीन ते बारा महिने ईएमआय
– आंबा हे सीझनल फळ आहे. सर्वांना याचा आस्वाद घेता यावा यासाठीच ही योजना आणली.
– हापूस आंब्याचे दर नेहमीच जास्त असतात. परंतु ज्याप्रमाणे आपण घरामध्ये फ्रीज, मोबाईल, कूलर आदी वस्तू ‘ईएमआय’वर आणतो, मग आंबा का नाही? या विचारातूनच ही योजना सुरू केली, असे गौरव सणस म्हणाले.
– ‘ईएमआय’ योजनेसाठी किमान पाच हजार रुपयांचे आंबे खरेदी करावे लागतील. ग्राहकांना डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करता येईल. तीन महिने, सहा किंवा बारा महिन्यांच्या हप्त्यांमध्ये ‘ईएमआय’ भरावा लागेल, असे सणस यांनी सांगितले.



























































