
तैवानचे अध्यक्ष सा इंग-वेन यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे चीन संतप्त झाला आहे. त्यामुळे चीनने तैवानच्या सीमेवर लढाऊ विमाने तैनात केली आहेत. चीनने शनिवारी आठ लढाऊ नौका आणि 42 लढाऊ विमाने तैवानच्या दिशेने पाठवली आहेत, अशी माहिती तैवान सरकारने दिली. चीनच्या या आक्रमक धोरणामुळे चीन-तैवानमधील संघर्ष वाढला आहे. सा यांनी अमेरिकी काँग्रेसचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हचे स्पीकर केविन मॅकार्थी यांची भेट घेतल्यानंतर चीनने हे पाऊल उचलले.
चीनच्या सैन्याने तैवानच्या सीमेवर गस्त घालण्यास सुरुवात केल्याचे जाहीर केले आहे. आता पूर्वीप्रमाणेच चीनकडून समुद्रामध्ये क्षेपणास्त्रे डागली जातील का, अशी शंका उपस्थित होत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सैन्याने क्षेपणास्त्रांचा मारा करून समुद्रातील मालवाहतूक आणि विमानांची उड्डाणे विस्कळीत केली होती. चीनच्या या पावलामुळे चीन-तैवानमधील संघर्ष पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.



























































