सरकारला दिलेल्या निवेदनांचा माग काढता येणार ई-सिटिझन ऍपवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mantralay

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री किंवा एखाद्या मंत्र्याकडे अर्ज, निवेदन सादर केल्यावर आपल्या पत्राचे पुढे काय झाले हे अर्जदाराला आतापर्यंत कळतच नव्हते, पण आता ई-सिटिझन ऍप विकसित करण्यात येणार आहे. या ऍपमुळे आपण दिलेले निवेदन-अर्ज नक्की कोणत्या पातळीवर आहे याची इत्यंभूत माहिती या ऍपवर अर्जदाराला मिळणार आहे.

सरकार दरबारी सादर होणारी निवेदने-अर्ज आता मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येणाऱया सेंट्रल रजिस्ट्री युनिटमध्ये स्वीकारण्यात येणार आहेत. निवेदन-अर्ज सादर करण्यासाठी अर्जदाराला मंत्रालयात जाण्याची गरज राहणार नाही. या युनिटमध्येच ही निवेदने स्वीकारण्यात येतील. या योजनेची सुरुवात 1 मे रोजी होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती.

बेब पोर्टल लोकाभिमुख

राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’च्या माध्यमातून 511 सेवांपैकी 387 सेवा नागरिकांना दिल्या जातात. शासनाच्या जास्तीत जास्त सेवा लोकाभिमुख करण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये 124 सेवांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना आपले अर्ज दाखल केल्यापासून सेवा सहज मिळाव्यात यासाठी मोबाईल ऍपदेखील सुरू करण्याची सरकारची योजना असल्याचे सुजाता सौनिक म्हणाल्या.