लोकविधा – आख्यानाचं ‘आख्यान’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मुकुंद कुळे

चैत्र लागला की, गावोगावच्या यात्रा-जत्रांना सुरुवात होते, तसंच वेगवेगळ्या समूहांच्या देवादिकांच्या वार्षिक कुळाचार-कुलविधींनाही सुरुवात होते. गोंधळ-जागरण-भराड यांसारख्या कुळाचार-कुलविधींना धार्मिक अधिष्ठान असलं तरी अनेकदा या विधींच्या उत्तरार्धात रंगवल्या जाणाऱ्या आख्यानांतच खरी गंमत असते. कारण आख्यानांमध्ये एखादी पौराणिक कथा रंगवून नाट्यात्मक पद्धतीने सांगितली जाते. केवळ महाराष्ट्रच नाही, संपूर्ण हिंदुस्थानात प्रत्येक लोककला प्रकारात आख्यान आहे. मग ते गुजरातच्या कलाकारांनी सादर केलेलं भवई असो, मध्य प्रदेशातील लोकगायकांनी गायलेलं पंडवानी असो नाहीतर कर्नाटकातलं यक्षगान असो, प्रत्येक कला प्रकारात कथा आहेच. एकाने दुसऱ्याला सांगितलेली किंवा समूहाने समूहाला सांगितलेली.

कथन केली जाणारी ती कथा. कुठनं आली ही कथा? तर आपण काहीतरी पाहिलेलं, ऐकलेलं दुसऱ्याला सांगण्याच्या सहजस्फूर्त ऊर्मीतून कथेचा जन्म झाला. ‘कथ्’ या संस्कृत धातूचा अर्थ ‘सांगणे’ असा आहे. ही काहीतरी सांगण्याची परंपरा आपल्याकडे, किंबहुना संपूर्ण जगातच फार पूर्वीपासून आहे. मात्र या काहीतरी सांगण्यातही कसब आहे, कौशल्य आहे हे फार थोड्या लोकांना उमगलं. ज्यांना ते उमगलं त्यांनी मग कथा सांगणं हा आपला व्यवसाय म्हणून स्वीकारला. हिंदुस्थानात अगदी पूर्वापार भांड, चारण-भाट हे लोककलावंत कथा सांगण्याचा उद्योग करत आले आहेत.

याच कलावंतांच्या बरोबरीने तेव्हा विशिष्ट धार्मिक भावनेने रुजलेले लोककलावंतांचे इतरही समूह होते, समाज होता. उदाहरणार्थ, गोंधळी, वाघ्या मुरळी, भराडी, आराधी असे कितीतरी. हे समूह म्हणजे विविध देवदेवतांचे उपासकच होते. आपल्या उपास्य देवतांशी संबंधित समृद्धीचे-सृजनाचे  विधी करायचे, त्यांची गाणी गायची हा या उपासकांचा मुख्य व्यवसाय, पण या धार्मिक कार्याबरोबरच नंतरच्या काळात या लोककलावंतांनी आपापल्या इष्ट देवतांच्या कथा लावायला म्हणजेच सांगायला सुरुवात केली आणि लोककलेतील आख्यान जन्मले.

…पण कथा लावता लावता कथेचं आख्यान कसं झालं? तर विविध उपासक सांगत असलेल्या कथा आपण पाहिल्या किंवा ऐकल्या तर लक्षात येतं की, त्या कथा म्हणजे एक प्रकारच्या आख्यायिका आहेत आणि या आख्यायिका पुराण ग्रंथांमधल्या, रामायण-महाभारतातल्या आहेत. लोककलावंतांनी या आख्यायिका आपल्या कार्यक्रमात सांगायला सुरुवात केली आणि आख्यायिकेवरून दीर्घ कथन असणारा आख्यान हा प्रकार जन्माला आला. या आख्यानांचा जीव म्हणजे आशय अतिशय छोटा असतो, परंतु विविध लोककलावंत जेव्हा त्या-त्या कथेवर आख्यान सादर करतात, तेव्हा त्याचा प्रभाव एखाद्या महानाट्यालाही मागे सारणारा असतो. कारण या आख्यानांमध्ये रंगभूषा, वेशभूषा लक्षवेधक नसली तरी शब्दांची फेक, आवाजातील चढउतार आणि ढोल-संबळ-तुणतुणं अशा लोकवाद्यांची हुकमी साथ भोवताल भारून टाकते.

लोककलांमधलं आख्यान वर्षानुवर्षे रसिकांवर गारूड करून आहे. कारण कुठल्याही लोककला प्रकारात सादर होणारं आख्यान हे लोकभावनेतूनच जन्माला आलेलं असतं. त्याला पुराण ग्रंथांतील कथांचा आधार असतो, पण त्याचं ं भरणपोषण लोकभावनेतून झालेलं असतं. उदाहरणार्थ, लोकपरंपरेतील ‘जांभूळ आख्यान’. गोंधळी सादर करीत असलेल्या या आख्यानाला महाभारतात काहीच आधार नाही. यातली पात्रं महाभारतातली आहेत, पण कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं आणि त्यामुळे तिचं सत्त्व लयाला गेलं असा कोणताही संदर्भ महाभारतात आढळत नाही. तरीही कुंतीपुत्र कर्ण हा ज्येष्ठ पांडव असल्यामुळे लोकमानसाने द्रौपदी त्याच्यावर भाळल्याची कल्पना रचली आणि त्यातून ‘जांभूळ आख्याना’सारखं लोकआख्यान उभं राहिलं. म्हणजे सांगायला आख्यानाचा मूलाधार पुराण ग्रंथांत किंवा रामायण-महाभारतासारख्या महाकाव्यांत असतो, परंतु एखादं सूत्र तेवढं घेऊन पुढची सारी कथा समाजानेच आपल्याला त्या पात्रांविषयी, त्यांच्या चरित्राविषयी काय वाटतं ते लक्षात घेऊन रचलेली असते. त्यामुळे बऱ्याचदा आख्यानांचा आशय पौराणिक असतो. मात्र त्याची अभिव्यक्ती ही सद्यकालीन असते.

महाराष्ट्रात किंवा एकूणच हिंदुस्थानात अशी आख्यानांची परंपरा खूप जुनी आहे. महाराष्ट्रातील बहुतेक लोककलावंत हे विविध लोकदेवतांचे उपासक आहेत. गोंधळी-आराधी हे अंबा, भवानी व रेणुकेचे, वाघ्या-मुरळी खंडोबाचे, तर भराडी भैरवनाथ-जोतिबाचे उपासक आहेत. या कलावंतांना त्या-त्या लोकदेवतांचे भगत असंही म्हटलं जातं. साहजिकच यामुळे ही लोककलावंत मंडळी सादर करत असलेल्या सर्व कला प्रकारांना धार्मिक अधिष्ठान आहे. ते सादर करत असलेल्या जागरण-गोंधळ-भराडाकडे आज कला म्हणून पाहिलं जात असलं तरी ती कला म्हणजे कुळाचार असलेले त्या-त्या देवतांचे धार्मिक विधीच असतात. मग विधिनाट्य स्वरूप असलेल्या या कुळाचारांत लोकांचं मनोरंजन करणारी आख्यानं कुठून शिरली?

तर तोही गमतीचा भाग आहे. विविध लोककलावंत देवतांसंबंधी कुळाचार म्हणून जो विधी करतात, तो लोकधर्म-लोकविधी असतो. या विधीत लोककलावंत यजमानाच्या कल्याणाप्रीत्यर्थ इष्ट देवतेची कलशरूपात मांडणी करून तिला येण्याचं आवाहन करतात. नंतर गण, गवळण, इष्ट देवतेची काही गाणी किंवा पदं म्हणतात. यादरम्यान या कुळाचाराचं आयोजन करणारा यजमान आणि या कुळाचारासाठी आलेले लोक प्रतीकात्मक प्रतिष्ठापना केलेल्या देवतेचं दर्शन घेऊन मोकळे होतात. कुळाचाराचे हे विधी साधारणपणे रात्री होतात. ते पाहण्यासाठी लोक जमलेले असतात. या जमलेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी म्हणून मग आख्यानाची जोड या कुळाचाराच्या विधींना दिली गेली.

सुरुवातीचे कुळाचाराचे धार्मिक विधी झाल्यावर मग उपस्थितांची करमणूक म्हणून कधी गाऊन तर कधी नाचून-गाऊन कथा सांगितली जाऊ लागली. कारण रात्र जागवायची असे. अर्थात, सगळेच लोककलावंत कथा किंवा आख्यान गाऊन म्हणजे पद्य पद्धतीने सादर करत नाहीत. बहुतांशी लोककलावंत आपल्या आख्यानात आधी गातात आणि मग गाण्यातला आशय गद्यात अधिक सोप्या भाषेत उलगडून दाखवतात. म्हणजे त्याचं निरुपण करतात. लोककलावंत या निरुपणालाच ‘सपादणी’ किंवा ‘संपादणी’ असं म्हणतात. आधीचे धार्मिक विधी आणि नंतरचा मनोरंजनात्मक कार्यक्रम यामुळे या कुळाचारांची दोन भागांत विभागणी झालेली आहे. देवतेची प्रतिष्ठापना, देवतांना आवाहन, गण-गवळण आणि देवतेची गाणी म्हणणं हे सर्व पूर्वरंगात मोडतं, तर उत्तररंगात आख्यान व उत्सवाचा-विधीचा समारोप हा भाग येतो.

महाराष्ट्रात जेवढ्या लोककला आहेत, त्या सर्व लोककलांची मांडणी याच पद्धतीने केलेली आहे. मग त्या लोककला कुळाचार म्हणून सादर होत असोत अथवा नसोत. प्रत्येक लोककलेच्या उत्तररंगात आख्यान लावलं जातंच.

आख्यानाची एक गंमत असते. कुठल्याही लोककला प्रकारात आख्यान सुरू झालं की, कलावंत आणि रसिक प्रेक्षक यांच्या भूमिका बदलतात. पूर्वरंगातील कुळाचाराचे विधी सुरू असतात तेव्हा तो कुळाचार करणारे लोककलावंत हे देवाचे उपासक असतात, तर उपस्थित मंडळी ही भक्त मंडळी असतात. मात्र उत्तररंगात आख्यान सुरू झाल्यावर कुळाचाराचे विधी करणारे उपासक कलावंताच्या भूमिकेत शिरतात आणि भक्त समुदाय रसिक प्रेक्षकाच्या भूमिकेत.

आख्यान- मग ते कुठलंही असाö कीर्तनातलं असो नाहीतर भराड, गोंधळातलं असो, रात्र जागवणे हाच त्याचा मुख्य उद्देश असतो. त्यासाठीच मग आख्यान अधिकाधिक रंगतदार करण्याचा सर्वजण प्रयत्न करतात. त्यासाठी गाणं, नाचणं, वेशभूषा तर साथीला असतेच, पण सगळ्यात महत्त्वाचा असतो तो त्या लोककलावंतांचा उत्स्फूर्तपणा. हा उत्स्फूर्तपणा कधीच कमी होत नाही. कारण प्रत्येकाने लोकरंजनासाठी आख्यान लावलेलं असलं तरी त्यामागे लोकधर्माचं अधिष्ठान असतंच. शेवटी आख्यान सादर करणाऱ्या लोककलावंतांसाठी ते केवळ आख्यान नसतं, तर त्यांच्यासाठी ते देवाबरोबर जगणं असतं.

[email protected]