
>>महेंद्र पाटील
कधीतरी आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या चांगल्या-वाईट गोष्टी आपल्या मनातच रेंगाळत राहतात. काही चांगले क्षण तर काही आठवणी, कधीकाळी कोसळलेला एखादा वेडा पाऊस, कधीतरी झालेली डोळ्यांची चकमक, एखादी काजळी संध्याकाळ, धूसर धुक्यातली एखादी कोवळी पहाट… अशा मनाला सुख देणाऱया कैक गोष्टी मनात रेंगाळत राहतात.
दुसरीकडे त्याच मनात धुमसत असतात कधी विझलेले निखारे, एखादा ज्वलंत विचार, मनात राहून गेलेल्या काही गोष्टी, एखादी खंत, घुसमटलेले प्रहर, उदासीन रात्र, राहून गेलेल्या भेटी, उराशी जपलेली अधुरी स्वप्नं, ओठांवर येता येता राहिलेले शब्द आणि त्या शब्दांमुळेच एखादी अधुरी राहिलेली गोष्ट… याच शब्दांनी पुन्हा एकदा मनात गर्दी केली होती. पुन्हा तेच शब्द मनात घोंगावत होते आणि तेच क्षण पुन्हा मनात येऊन जसेच्या तसे माझी वाट पाहत होते. फक्त या वेळी त्यांनी आधार घेतला होता स्वप्नांचा. होय तेच वेडे, जुने हरवलेले क्षण पुन्हा माझ्या भेटीला आले होते. तोच निष्पाप, निरागस चेहरा दिसला तरी हुबेहूब माझ्या समोर येऊन उभा आहे असं मला वाटू लागलं आणि मग माझं वेडं मन पुन्हा थोडं मागे गेलं… कितीदा सांगावं मनाला, नको असं धावत जाऊ मृगजळाच्या मागे. तरी ते ऐकत नाही माझं. शेवटी माझंच मन ते. ऐकणार तरी कसं? म्हणून आता बरेच दिवस उलटून गेल्यावरही त्याला धूसर धुक्याच्या पहाटे तोच चेहरा स्वप्नात दिसू लागल्यावर ते हुरळून गेलं आणि धावू लागलं त्या फसव्या क्षणांच्या मागे. शोध घेऊ लागलं त्या गोड क्षणांच्या मनातल्या विचारांचा आणि त्याचं असं पुन्हा माझ्या मनात येऊन डोकावण्याचं कारण काय असेल या विचारात ते गुंतलं. हळूहळू त्याला या प्रश्नांची उत्तरं सापडत गेली, पण त्याने ती त्याच्या पुरती मर्यादित ठेवली. किती हुशार आणि लबाड असतं नाही आपलं मन? आपल्याला हसायला शिकवतं आणि आपल्याला रुसायलाही हेच मन शिकवतं. आठवणी गोळा करून ठेवतं आणि पुन्हा त्याच आठवणींची घुसमट आपल्याच डोळ्यांत पाणी आणतं. अशा वेळी पुन्हा धीरसुद्धा देतं आणि नव्याने जगायलासुद्धा शिकवतं हे मन. अशा या मनाला आपण उगीच गुलामासारखं वागवायला जातो, पण खरं तर मन राजासारखं असतं व आपण त्या मनाचे फक्त गुलाम असतो. मन हा जगातला एकमेव असा राजा असावा, ज्याने आपण गुलाम झालो का। तो आपल्याला सगळ्या जगावर राज्य करायला शिकवतो. या अशा वेड्या मनाला वेडं करून जाणारी आठवण म्हणजे एक गोड परी. होय, परी हेच नाव शोभतं तिला. चंचल, सुंदर, आपल्याच दुनियेत मशगूल असणारी एक स्वच्छंदी परी. मनाला पाहताक्षणी भावणारी, मनात घर करून जाणारी, मनावर राज्य करणारी एक अशी वेडी परी की, जणू एका वेड्या कवीची ती एक वेडी कल्पना!
जिच्या एका नजरभेटीने आसमंत वेडा व्हावा अन् मनाचे पिसारे फुलून यावेत. सागरी किनारे बेभान व्हावेत, मुक्या भावनांचे गीत जुळून यावे अशी ती वेडी परी आज पुन्हा स्वप्नात येऊन साद घालून गेली मनाला. धूसर पहाट जशी ओसरली तशा सूर्याच्या कोवळ्या किरणांनी डोळ्यांसमोर गर्दी केली आणि त्या मनाला पुन्हा जिथे आहे तिथेच येऊन उभं केलं. मृगजळाच्या पाठीमागे धावत जाऊन पुन्हा एकदा आपली ओंजळ रिकामीच असल्याचं त्यालाही जाणवलं होतं. त्याने तिच्या मनाचा घेतलेला थांग, स्वप्नावाटे तिच्या मनाशी झालेल्या त्याच्या गप्पा, सगळं काही संध्याकाळ होईपर्यंत मला सांगत राहिलं. तोवर सांजसनईची धून कानावर आली आणि पुन्हा एकदा माझ्या शब्दांनी एकत्र येऊन एक चारोळी केली…
सूर्य मध्यान्हीचे ऊन
तिच्या ओळखीची खूण…
सांज सनईची धून
तिच्या ओळखीची खूण…



























































