
चार दिवसांपासून आग ओकणारा सूर्य आज मुंबईकरांवर अक्षरशः कोपला. 32 अंशांवर रेंगाळणारा तापमानाचा पारा आज चक्क 33.8 अंशांवर पोहचला असून हवेतील आर्द्रताही वाढली आहे. त्यामुळे मुंबईकर चांगलेच घामाघूम झाले होते. रखरखत्या उन्हामुळे हवालदिल झालेल्या चाकरमान्यांनी डोक्यावर रुमाल, स्कार्फ आणि डोळ्यावर गॉगल लावल्याचे दिसत होते. राज्यभरातही उष्णतेची लाट असून तापमानात मोठी वाढ झाली आहे.
हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली असतानाच तापमानात मोठी वाढ झाली आहे. मुंबईच्या तापमानात तीन-चार दिवसांत दोन-तीन अंशांची वाढ झाली आहे, तर राज्यातील तापमानाचा पारा 44 अंशांच्या पुढे गेला आहे. मुंबईत बेस्ट बससह काळी-पिवळी टॅक्सी आणि लोकलने प्रवास करणारे प्रवाशी पुरते घामाघूम झाले होते. यापासून सुटका करून घेण्यासाठी अनेकांनी आपला मोर्चा लिंबू-पाण्याच्या गाडय़ा, उसाचा रस आणि कोल्ड्रिंक्सकडे वळवल्याचे दिसत होते.
विजेची 29 हजार मेगावॅटची विक्रमी मागणी
मुंबईसह राज्यभरात तापमानाचा पारा वाढल्याने आज विजेची तब्बल 29 हजार मेगावॅट एवढी विक्रमी मागणी नोंदली आहे. याआधी महावितरणकडे 25 हजार 350 मेगावॅट तर मुंबईत 3647 मेगावॅट एवढी मागणी नोंदली आहे. सदरची विजेची मागणी आतापर्यंतची सर्वाधिक आहे.
पारा 33.8 अंशांवर, आर्द्रताही वाढली,कोल्हापुरात उष्णतेची लाट; तिघांचा मृत्यू
कोल्हापूर जिह्यातही उष्णतेची लाट आली असून सोमवारी कागल तालुक्यातील वेलावळे खुर्द येथे उष्माघाताने तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
चार दिवसांत तापमान आणखी वाढणार
पुढील चार-पाच दिवसांत मुंबईसह राज्यभरातील तापमानात 2-4 अंशांची वाढ होईल, उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात पावसाची शक्यता
हवामान खात्याने पुणे शहरासह जिह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवतानाच यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच दुपारच्या सुमारास शहरातील तापमानात मोठी वाढ होणार असल्याचे ट्विट हवामान विभागाचे के.एस. होशाळीकर यांनी केले आहे.
तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
- सांताक्रूझ 33.8
- कुलाबा 32.2
- चंद्रपूर 43.1
- गोंदिया 43.2
- वर्धा 42.5
- वाशीम 41.4
- यवतमाळ 41.5
- नागपूर 40.9
- बुलढाणा 42.0
- परभणी 41.9
- अकोला 42.8
- सोलापूर 40.8
- संभाजीनगर 39.2
- पुणे 38.2























































