
हिंदुस्थानची लोकसंख्या 142 कोटी 86 लाख आहे, तर चीनची लोकसंख्या केवळ 142 कोटी 57 लाख आहे. हिंदुस्थान आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. हिंदुस्थानात आता चीनपेक्षा सुमारे 30 लाख जास्त लोक आहेत. UN च्या अहवालानुसार हिंदुस्थानची लोकसंख्या एका वर्षात 1.56 टक्क्यांनी वाढली.
1950 नंतर पहिल्यांदाच हिंदुस्थानची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त
अहवालातील नवीन आकडेवारी ‘डेमोग्राफिक इंडिकेटर्स’ श्रेणीत देण्यात आली आहे. UN 1950 पासून जगातील लोकसंख्येची आकडेवारी जाहीर करत आहे. त्यानंतर पहिल्यांदाच हिंदुस्थानने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असे दिसून आले आहे की, गेल्या 6 दशकांत प्रथमच चीनच्या लोकसंख्येमध्ये घट झाली आहे. चीनमधला जन्मदरही कमी झाला असून तो यंदा मायनसमध्ये नोंदवला गेला आहे.
चीनमध्ये लोक जास्त जगतात
चीनमधील सरासरी आयुर्मान हिंदुस्थानपेक्षा चांगले आहे. येथे पुरुषांचे सरासरी वय 76 वर्षे आणि महिलांचे सरासरी वय 82 वर्षे आहे. तर आपल्याकडे पुरुषांचे सरासरी वय 74 वर्षे आणि महिलांचे सरासरी वय फक्त 71 वर्षे आहे. UNFPA हिंदुस्थानच्या प्रतिनिधीने सांगितले की, आता जगाची लोकसंख्या 8 अब्जांवर पोहोचली आहे. हिंदुस्थानच्या 1.4 अब्ज लोकांकडे आम्ही 1.4 अब्ज संधी म्हणून पाहणार आहोत. ते म्हणाले की, हिंदुस्थान हा एक शक्तिशाली देश आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत सातत्याने पुढे जात आहे. तांत्रिक बाबींमध्ये आम्ही रोज नवनवीन विक्रम करत आहे.
तरुणांची संख्या सर्वाधिक
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, हिंदुस्थानातील 25% लोकांचे वय 14 वर्षांपर्यंत आहे. 10-19 वयोगटातील 18% लोक आहेत. 10-24 वयोगटातील लोकांची संख्या 26% आहे, त्यानंतर 15-64 वयोगटातील सुमारे 68% लोक आहेत. म्हणजेच भारतात तरुणांची सर्वाधिक संख्या आहे, पण चीनमध्ये तसे नाही. त्यात वृद्धांची संख्या सर्वाधिक आहे. चीनमध्ये 20 कोटी लोक 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.
लोकसंख्या कधी वाढली याची माहिती नाही
आकडेवारी जाहीर केल्यानंतर, UNFPA च्या मीडिया सल्लागार अॅना जेफरीस म्हणाले की, हिंदुस्थानची लोकसंख्या चीनच्या लोकसंख्येच्या पुढे कधी गेली हे स्पष्ट नाही. दोन्ही देशांची आकडेवारी जाहीर करण्याच्या वेळेत खूप फरक आहे, त्यामुळे अंदाज बांधणे कठीण आहे. आपण सांगू शकतो की चीनची लोकसंख्या गेल्या वर्षी सर्वोच्च पातळीवर होती, त्यानंतर ती 8.5 लाखांनी कमी झाली. याउलट हिंदुस्थानातील लोकसंख्या सातत्याने वाढत आहे.






















































