मोबाईल गेम्सच्या सापळ्याचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अ‍ॅड. प्रदीप उमाप

मोबाईल तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रचार वेगाने झाल्याचे अनेक फायदे समोर दिसत असले तरी या ऑनलाइन विश्वातील भूलभुलैयाने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्तही झाले आहे. जालन्यातील एका तरुणाने ‘मॉस्ट बेट’ या हिंदुस्थानात बंदी असलेला गेम इंटरनेटवरून डाऊनलोड करून घेत खेळण्यास सुरुवात केली आणि त्या चक्रात 40 लाख रुपये घालवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. राज्यातील, देशातील खेडय़ापाडय़ांत तसेच शहरांमध्ये असंख्य जणांना अशा गेम्समुळे मोठे नुकसान सोसावे लागले आहे. याबाबत कायदेशीर तक्रार करता येत असली तरी बहुतेकदा अशा गेम्स डाऊनलोड करताना किंवा खेळण्यास सुरुवात करताना आपण सर्व प्रकारची संमती दिलेली असते. त्यामुळे अशा फसव्या गेम्सच्या सापळय़ापासून तरुणांनी दूर राहणे गरजेचे आहे.

जालना जिह्यातील परमेश्वर केंद्रे नामक एका तरुणाला मागच्या एका वर्षापासून ‘मॉस्ट बेट’ नावाचा गेम खेळण्याची सवय लागली. सुरुवातीला तो शंभर, एक हजार रुपयांनी हा गेम खेळला. यामध्ये त्याला बऱ्यापैकी पैसेही मिळाले. त्यानंतर तो हजारो रुपये यामध्ये गुंतवून हा गेम खेळू लागला. बघता बघता यामध्ये शेतजमीनही विकावी लागली असून वर्षभरात त्याने तब्बल 40 लाख रुपये गमावले आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी आज या तरुणाला गावात पानटपरी चालवण्याची वेळ आली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणाने थेट पोलिसांत धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करून न घेता सायबर पोलिसांनी त्याला बँक स्टेटमेंट आणण्याचा सल्ला दिला. या छोटय़ाशा गावात तीस ते चाळीस मुले या गेमला बळी पडली असल्याचे सांगितले जाते. ‘मोस्ट बेट’ या गेमवर हिंदुस्थानात बंदी आहे. त्यामुळे हा गेम प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही, पण परमेश्वरने ऑनलाइन लिंकद्वारे हा गेम डाऊनलोड केला आणि होतं नव्हतं ते सगळं घालवून बसला.

गतवर्षी इंदूरमधील बसंत नामक एका तरुणाने आत्महत्या केली. आपल्या मेव्हण्यासोबत तो इंदूरमध्ये राहत होता. तो एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याला ऑनलाइन लुडो खेळण्याचे व्यसन होते. या गेममध्ये त्याने पैसेही गुंतवले होते. गेमिंगमुळे वसंत खूप कर्जबाजारी झाला होता. यामुळे तो खूप तणावाखाली होता. बसंतने त्याच्या सुसाईड नोटमध्ये संपूर्ण प्रकरण नोंदवून ठेवले. त्यानुसार त्याला ऑनलाइन गेममध्ये खूप त्रास झाला. यामध्ये त्यांचे सुमारे 17 हजार रुपयांचे नुकसान झाले. हे पैसे त्याने त्याच्या मालकाकडून घेतले होते. पैसे परत करणे कठीण होऊन दबाव वाढू लागल्यावर त्याने मृत्यूला कवटाळले.

तामीळनाडूची राजधानी चेन्नईमधील मनाली या 29 वर्षीय विवाहित महिलेने न्यू टाऊनमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या महिलेला ऑनलाइन रम्मी खेळण्याचे व्यसन जडले होते. या व्यसनात तिने घरातील 20 तोळय़ांचे सोन्याचांदीचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड गमावली. भवानीच्या कुटुंबातील सदस्यांनी तसेच नातेवाईकांनी तिला वारंवार रम्मी खेळण्यापासून दूर राहण्याचे सांगितले. मात्र तरीही भवानीने ऑनलाइन गेम खेळणे सुरूच ठेवले. ऑनलाइन गेममुळे भवानीचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच, शिवाय तिच्यावर कर्जही झाले होते. तिला कर्ज फेडण्याची चिंता सतावत होती, पण आपण ऑनलाइन गेममध्ये पैसे जिंकू आणि डोक्यावरचं कर्ज फेडू असा तिचा मानस होता. त्यामुळे तिने आपल्या दोन बहिणींकडून तीन लाख रुपये उसने घेतले आणि पुन्हा ऑनलाइन गेम खेळण्यास सुरुवात केली. मात्र यातही तिचे नुकसान झाले आणि अखेर तिने तणावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

किती भीषण आणि धक्कादायक आहेत या घटना? हल्ली दररोज वर्तमानपत्र उघडले की, अशा प्रकारची एखादी तरी बातमी वाचायला मिळते. अशा बातम्या वाचून कोणाही सहृदयी माणसाचे मन हेलावून जाते. मग प्रत्यक्ष ज्याचा पैसा जातो, त्याच्या मनाची काय अवस्था होत असेल? हे अतीव दुःख, हाराकिरी, त्यातून आलेले नैराश्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुष्यभर झिजूनही गेलेला प्रचंड पैसा परत मिळवू शकू की नाही याबाबतची साशंकता, जोडीला हा पैसा देण्यासाठी वाढणारा दबाव या सर्वांतून अखेरीस मृत्यूला कवटाळले जाते. एकविसाव्या शतकात मोबाईल आणि इंटरनेट तंत्रज्ञानाच्या प्रगतीने किती असाध्य गोष्टी साध्य झाल्या आहेत, वेगवान झाल्या आहेत, सुकर झाल्या आहेत याची प्रचीती आपण सर्व जण घेत असताना याच ऑनलाइन विश्वाची ही काळी बाजू किती भीषण आहे? घडलेल्या सर्व घटनांमध्ये सदर व्यक्तीच दोषी आहेत यात शंकाच नाही, परंतु त्यांना दोषी ठरवून या समस्येला पूर्णविराम देता येईल?

मुळात वर उल्लेख केलेली उदाहरणे ही माध्यमांमधील बातम्यांमुळे समोर आली आहेत. प्रत्यक्षात ती हिमनगाचे टोक आहेत. गेल्या दोन-चार वर्षांमध्ये देशात झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी लाखो रुपये गमावलेल्यांची संख्या काही हजारांमध्ये, लाखांमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेअर बाजारातील फ्युचर-ऑप्शन ट्रेडिंगमध्ये दररोज हजारो रुपये गमावणाऱयांचे प्रमाणही अलीकडील काळात प्रचंड वाढले आहे. ऑनलाइन रम्मीसारखे गेम आणि शेअर बाजारातील ट्रेडिंग या दोन्हीची तुलना करता येणार नाही. कारण बहुतांशी ऑनलाइन गेम्स या लोकांची लुबाडणूक करण्यासाठीच बनवल्या गेल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून अनेक नियमांचे उल्लंघन राजरोसपणाने होत असते ही वस्तुस्थिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपल्याच समाजाने डोक्यावर घेतलेले सिलेब्रिटी अशा गेमिंग ऍप्सच्या जाहिरातींमधून झळकताना दिसतात आणि पैसे मिळवून श्रीमंत व्हा अशा आशयाचे आवाहन करताना दिसतात. या आवाहनासाठी त्यांना भरभक्कम पैसा मानधन म्हणून मिळत असला तरी त्यामुळे अनेकांची दिशाभूल होते हे लक्षात घ्यायला हवे. अर्थात कोणत्याही प्रकारच्या व्यसनाबाबत दुसऱयावर खापर फोडणे हे चुकीचे असते. कारण व्यसनाधीन व्यक्ती ही स्वतःच्या मानसिक, आर्थिक स्वार्थासाठी, गरजेसाठी, आनंदासाठी ते व्यसन करत असते. ऑनलाइन गेम्सच्या नादाला लागून पैसे गमावणाऱ्यांनाही त्यांचे मित्र, कुटुंबीय, नातेवाईक त्यापासून लांब राहण्याचा सल्ला देतच असतात, परंतु या खेळांमध्ये दिसणारा पैशांचा आकडा हा असे सल्ले झुगारण्यास प्रवृत्त करतो. इथे काही तासांत पैसे दुप्पट-तिप्पट होतात आणि आपण ते करू शकतो असा फाजील, फसवा आत्मविश्वास अशा गेम्सच्या आहारी गेलेल्यांमध्ये आलेला असतो आणि तोच अखेरीस त्यांचा घात करतो.

कायद्याच्या अंगाने विचार करता केंद्र सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंगसाठी नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार कोणत्याही प्रकारच्या सट्टा आणि जुगाराला मनाई करण्यात आली आहे. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. ऑनलाइन गेमिंग कंपन्यांची यापुढे ‘केवायसी’ही पडताळणी करण्यात येणार आहे. सरकारकडून कोणती पावले उचलली जातात, त्यांची अंमलबजावणी कशी होते हे येणाऱया काळात दिसून येईल, परंतु सायबर विश्वामध्ये कायद्यांपेक्षा पळवाटा अधिक आहेत. जालन्याच्या तरुणाचेच उदाहरण घेतल्यास हिंदुस्थानात बंदी असणारा गेम त्याने इंटरनेटवरील लिंकद्वारे डाऊनलोड करून घेतला आणि खेळण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे. अशा वेळी कायदे कडक करून काय उपयोग? दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईलमध्ये कोणतेही गेमिंग ऍप किंवा अन्य ऍप डाऊनलोड करताना आपण असंख्य प्रकारच्या परवानग्या न वाचता-न विचार करता स्वखुशीने देत असतो. त्यामुळे त्यानंतर घडणाऱया सर्व परिणाम-दुष्परिणामांची जबाबदारी ही आपली आहे, असे गेम खेळणाऱयाने ऍप निर्मात्या कंपनीला एका अर्थाने लिहून दिलेले असते. त्यामुळे अनेकदा कायदेशीरदृष्टय़ाही अशा कंपन्यांना कचाटय़ात अडकवणे कठीण ठरते. म्हणूनच कायद्याच्या प्रक्रियेचा विचार करण्यापेक्षा या सापळय़ापासून लांब राहणे, त्यात स्वतःला अडकू न देणे याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे.
(लेखक कायदे अभ्यासक आहेत)