
बारसूतील प्रस्तावित रिफायनरी रेटण्यासाठी ईडी सरकारची पोलिसांकरवी दडपशाही सुरू आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे आणि अन्य सहा आंदोलकांना पोलिसांनी डांबून ठेवले आहे. या सर्वांच्या सुटकेसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून आज शिवणे गावात गावकऱयांनी मोर्चा काढून निषेध नोंदवला. आंदोलकांची सुटका न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.
रिफायनरीविरोधात प्रकल्पग्रस्तांनी आरपारची लढाई पुकारली आहे. 5 मे रोजी दरीखोऱयातून रानवाटेने हजारो ग्रामस्थ बारसूच्या माळरानावर धडकले होते. आंदोलकांच्या पाच तुकडय़ा वेगवेगळ्या वाटेने आंदोलनस्थळी पोहचल्या होत्या. मात्र, पोलिसांनी दडपशाहीने आंदोलकांना पांगवले. तेव्हा रिफायनरी विरोधी संघटनेच्या पदाधिकाऱयांची धरपकडही करण्यात आली होती. त्या सर्वांची अद्याप सुटका करण्यात आली नसून त्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शिवणे गावात ग्रामस्थानी आधी उपोषण केले आणि आज निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठय़ा संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.
काँग्रेसचाही रिफायनरीला विरोध
काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी शिवणे गावात गावकऱयांशी संवाद साधला व विनाशकारी रिफायनरीला विरोध दर्शविला. आमदार हुस्नबानू खलीपे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष भरत लब्धे, इब्राहिम दलवाई, जिल्हा सेवादल अध्यक्ष तुळशीराम पवार, अशोक भुस्कुटे, अहमद दलवाई सोबत होते. ग्रामस्थांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. हरित रिफायनरी म्हणून दिशाभूल केली जात असून हा प्रकल्प कोकणची राखरांगोळी करणारा आहे, असा आरोप दलवाई यांनी केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाबाबत जी भूमिका घेतली तीच आमचीही भूमिका आहे, असे दलवाई म्हणाले. स्थानिकांना प्रकल्पात नोकऱयांचे आमिष दाखवले जात आहे. पण मिळाल्याच तर केवळ सुरक्षा रक्षक म्हणून नोकऱया मिळतील. रिफायनरीसाठी कुशल कामगार लागतात. तशी प्रशिक्षणांची कोणतीच व्यवस्था नसताना नोकऱयांचे आश्वासन ही फसवणूक आहे, असे ते म्हणाले.



























































