
गुरुवारी सर्वांच्या लक्षात यशस्वी जैसवाल राहिला असेल, पण त्याआधी कोलकाताचे 4 विकेट टिपणाऱया युजवेंद्र चहलला विसरून कदापि चालणार नाही. गुरुवारी त्याने अवघ्या 25 धावांत 4 विकेट घेत कोलकात्याला 149 धावांत रोखले होते. या कामगिरीच्या जोरावर त्याने गोलंदाजांसाठी महत्त्वाची असलेली ‘पर्पल कॅप’ही मिळवली. अजून त्याला किमान दोन सामने खेळायचे आहेत आणि सध्या तो 21 विकेटसह ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. गेल्या वर्षी त्याने सर्वाधिक 27 विकेट घेत ‘पर्पल कॅप’चा मान मिळविला होता. आता तो ‘डबल पर्पल कॅप’च्या प्रयत्नात आहे. त्याची फिरकी त्याला यश मिळवून देते की नाही ते लवकरच कळेल.
चहलसाठी यंदाचे आयपीएलही भन्नाट जात आहे. ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या गोलंदाजांना एकदाही चार विकेट घेता आलेले नाहीत, मात्र चहलने ही कामगिरी चक्क तिसऱयांदा केली आहे. गेल्या वेळी अशी किमया अॅण्ड्रय़ू टायने केली होती. जेव्हा जेव्हा चहलच्या फिरकीने कमाल केलीय तेव्हा तेव्हा राजस्थानने विजय मिळविला आहे. यावेळी ‘पर्पल कॅप’साठी जोरदार चुरस असून जो संघ प्ले ऑफ खेळेल त्या संघांतीलच गोलंदाज ‘पर्पल कॅप’चे दावेदार असतील, हे निश्चित आहे. त्यामुळे चहलला ‘पर्पल कॅप’ जिंकायची असेल तर त्याचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचायलाच हवा. कारण प्ले ऑफमध्ये पोहोचणारा संघ दोन किंवा तीन सामने अधिक खेळतो.
सलग दुसऱयांदा जिंकणार
आयपीएलच्या इतिहासात ‘पर्पल कॅप’ सलग दोनदा जिंकण्याचा पराक्रम आजवर एकाच गोलंदाजाला करता आला आहे. तो गोलंदाज म्हणजे हैदराबादचा भुवनेश्वर कुमार. त्याने 2016 आणि 2017 साली 26 आणि 23 विकेट घेत ‘पर्पल कॅप’ जिंकण्याचा पराक्रम केला होता. आता चहललाही ही संधी प्राप्त झाली आहे. तसेच चेन्नईच्या ड्वेन ब्राव्होने 2013 आणि 2015 साली ‘पर्पल कॅप’ जिंकली आहे. याव्यतिरिक्त एकही गोलंदाज दोनदा ‘पर्पल कॅप’चा मानकरी ठरलेला नाही.
ब्राव्हो–पटेलचा विक्रम मोडणार
ड्वेन ब्राव्हो आणि हर्षल पटेल या गोलंदाजांनी आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक 32 विकेट टिपले आहेत. चहलची कामगिरी पाहता तो हा विक्रम मोडू शकतो, फक्त त्यांचा संघ अंतिम फेरीत पोहोचायला हवा. चहलने आतापर्यंत 12 सामन्यांत 21 विकेट टिपले आहेत.
युजवेंद्र चहल आयपीएलला सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. गुरुवारी त्याने पहिला विकेट घेताच ड्वेन ब्राव्होच्या आयपीएलच्या सर्वाधिक 183 विकेटच्या विक्रमाला मोडीत काढले. आता तो 187 विकेटसह अव्वल स्थानावर आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्राव्होने 161 सामन्यांत 183 विकेट टिपले होते तर चहलने 143 व्या सामन्यांतच त्या विक्रमाला मागे टाकले. आता चहलच्या मागावर पीयूष चावला (174), अश्विन (171) हे प्रमुख गोलंदाज आहेत.





























































