साय-फाय – पांढरे सोने; कोणाच्या ताब्यात जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रसाद ताम्हणकर

ग्लोबल वॉर्मिंगचे तडाखे बसू लागले आणि जगातील प्रमुख देशांची झोप उडाली. मग सर्व प्रमुख देशांनी आपल्याला जागतिक पर्यावरणाची किती किती काळजी आहे याचा जयघोष करत ‘हरित ऊर्जा झिंदाबाद’ चे नारे द्यायला सुरुवात केली. आता या हरित ऊर्जेसाठी महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे लिथियम. भविष्यातील तारणहार मानल्या जात असलेल्या आणि बॅटरीवर चालणाऱया गाडय़ांच्या बॅटरीमध्ये आढळणारा प्रमुख घटक तो हाच लिथियम. याला जगभरात पांढरे सोने म्हणूनदेखील ओळखले जाते. आता संपूर्ण जगात या पांढऱया सोन्याला मिळवण्यासाठी जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. अर्थात नेहमीप्रमाणे इथेदेखील दोन मुख्य प्रतिद्वंद्वी आहेत ते अमेरिका आणि चीन.

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या या पांढऱया सोन्याचा सर्वात मोठा साठा लॅटिन अमेरिकेतील तीन प्रमुख देशांमध्ये म्हणजेच अर्जेंटिना, बोलिव्हिया आणि चिलीमध्ये आहे. याला ‘लिथियम ट्रंगल‘ असेदेखील नाव आहे. जगात जेवढे म्हणून लिथियम आहे त्याचा अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा या तीन देशांमध्ये आढळतो. त्यामुळेच जगभरातील प्रमुख देश आणि मोठे गुंतवणूकदार यांचे लक्ष या ट्रंगलकडे आकर्षित झाले आहे. लिथियमची बाजारपेठ मोठय़ा झपाटय़ाने वाढत आहे आणि भविष्यात ती चांगली फोफावणार आहे हे नक्की.

लिथियम नावाच्या या खनिजासाठी जी स्पर्धा चालू झाली आहे त्यात अमेरिकेच्या आधी चीनने बरीच पुढे मजल मारलेली आहे असे म्हणायला हरकत नाही. मात्र आता अमेरिकेनेदेखील जोर लावला असून त्यांना चीनला मागे टाकून पुढे जायचे आहे. मात्र या खनिजाचे आणि ट्रंगलचे महत्त्व ओळखून चीनने फार पूर्वीच या देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करून ठेवलेली आहे. त्या जोडीलाच जगभरातील इतर देशांतदेखील या खनिजासाठी चीनची शोध मोहीम सुरू आहे ती वेगळी.

अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, 2022 च्या आकडेवारीनुसार जगात 860 लाख टन लिथियमचा साठा आढळून आला आहे. त्यामध्ये सर्वात मोठे साठे बोलिव्हियामध्ये आहेत. यानंतर अर्जेंटिना, चिली, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिको या यादीत आहेत. लिथियमच्या खाणकामात आणि मोठय़ा प्रमाणावर उत्पादनात चिली आघाडीवर आहे, तर मेक्सिको 17 लाख टन लिथियम साठय़ासह उत्तर अमेरिकन बाजारपेठेतील एक प्रमुख हिस्सेदार बनत चालला आहे. विशेष म्हणजे मेक्सिको हा भौगोलिकदृष्टय़ा अमेरिका आणि कॅनडाच्या जवळ आहे. त्यामुळे तो सध्या बॅटरीवर चालणाऱया कारच्या उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनत आहे.

अलीकडच्या काळात टेस्ला आणि BMW सारख्या मोठय़ा कार उत्पादकांनी मेक्सिकोमध्ये त्यांचे कारखाने बांधले आहेत. मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते की, टेस्ला कंपनीचा कार कारखाना अमेरिकेतील टेक्सासपासून सुमारे तीन तासांच्या अंतरावर मॉन्टेरी येथे बांधला जाईल, तर या वर्षी फेब्रुवारीमध्ये BMW ने जाहीर केले होते की, 2027 पासून त्यांच्या सॅन लुईस पोटोसी, मेक्सिको येथील कारखान्यात त्यांची नवीन कार तयार होण्यास सुरुवात होईल. हा कारखाना त्यांच्याकडून 2019 मध्ये बांधण्यात आला होता.

एका अहवालानुसार जगभरातील लिथियमचे साठे 2025 पर्यंत संपण्याची शक्यता आहे. हे पाहता या खनिजासाठी इतके युद्ध का चालू आहे त्याचा उलगडा होईल. अमेरिका आणि चीनच्या या युद्धात चीनने आघाडी घेतली तर ती हिंदुस्थानसाठी नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे. चीनबरोबरचे हिंदुस्थानचे संबंध ताणलेले असताना हरित ऊर्जेसाठी अत्यावश्यक अशा लिथियमच्या आपल्या मागणीला चीन कसे प्रत्युत्तर देईल, हे सांगता येणे अवघड आहे. हिंदुस्थानसारखा विकसनशील देश मोठय़ा प्रमाणावर हरित ऊर्जेच्या वापराकडे वळत आहे. अर्थात, देशाची लिथियमची मागणीदेखील वेगाने वाढत जाणार आहे. अशा वेळी या युद्धाच्या काळात इतर पुरवठादार देशांशी संबंध चांगले ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक प्रगतीसाठी खनिजे अत्यंत महत्त्वाची असल्याचे घोषित करून टाकले आहे. मुख्य म्हणजे या यादीत त्यांनी कोबाल्ट आणि लिथियमसारख्या खनिजांचा समावेशदेखील केला आहे.

[email protected]