
अकोल्यामध्ये शनिवारी रात्री दोन गटामध्ये तुफान राडा झाला. किरकोळ वादाचे पर्यवसन हाणामारीमध्ये झाले आणि यानंतर दंगल उसळली. दोन्ही बाजुने तुफान दगडफेक झाली, वाहनं पेटवण्यात आली आणि एका घरालाही आग लावण्यात आली. रात्री साडे अकराच्या सुमारास जुन्या शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिहरपेठ भागात हा प्रकार घडला. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे हा प्रकार घडला आहे. वादग्रस्त पोस्टमुळे आधी किरकोळ वाद झाला. या वादाचे रुपांतर हिंसक हाणामारीमध्ये झाले. हिंसक जमावाने दुचाकी, चारचाकींची तोडफोड आणि जाळपोळ केली. यादरम्यान एका घराला आगही लावण्यात आली. या हिंसक हाणामारीमध्ये 8 जण जखमी झाले असून एका मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
रात्रीच्या सुमारास अचानक झालेल्या या घटनेमुळे शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हिंसक जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने पोलीस व्हॅन आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांवरही दगडफेक केली. तसेच दुचाकी आणि चारचाकींच्या काचा फोडल्या. त्यामुळे हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच हवेत गोळीबार केल्याचेही वृत्त आहे. या प्रकरणी आतापर्यंत 26 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती अकोल्याचे एसपी सुंदीप घुगे यांनी दिली.
#UPDATE | Tension prevailed between the two communities over hurting religious sentiments. Stone pelting happened, vehicles were also damaged. Heavy police deployment is there in the city. One was brought dead to Civil Hospital, but we are investigating it. As of now, 26 people… pic.twitter.com/oZ8UZKafnA
— ANI (@ANI) May 14, 2023
कलम 144 लागू
‘धार्मिक भावना दुखावल्याच्या वादातून दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. हिंसक जमावाने दगडफेक केली, काही वाहनांचेही नुकसान केले आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे’, अशी माहिती अकोल्याचे एसपी सुंदीप घुगे यांनी दिली. तर शहरामध्ये कलम 144 लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी दिली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
“Following the violent clashes in Akola, Section 144 has been imposed in the city,” says Akola Collector Neema Arora
— ANI (@ANI) May 14, 2023
अफवांवर विश्वास ठेवू नका
दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील शहरात उसळलेल्या दंगलीची माहिती घेतली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहे. तसेच नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.



























































