कवडसे – क्षितिज पाखरं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेंद्र पाटील

प्रत्येकाच्या मनात एक क्षितिज असतं आणि प्रत्येकाला तिथे जायची ओढ असते. प्रत्येकाचं क्षितिज वेगळं असतं आणि त्या क्षितिजाकडे जाणाऱ्या वाटासुद्धा वेगवेगळ्या असतात. एखाद्या मोकळ्या माळरानावरून दूरपर्यंत दिसणारं आभाळ जिथे जमिनीला स्पर्श करतं असा भास करणारा बिंदू म्हणजे क्षितिज! म्हणावं तर काल्पनिक, पण नव्या उमेदीने प्रवास करायला शिकवणारा हा बिंदू आहे. कधी ना कधी आपल्या मनातलं ध्येय साध्य करण्यासाठी आपण या क्षितिजाबरोबर प्रवास करतो आणि चालू लागतो त्या शोधात. ती वाट कधी संपतच नाही. दूरवर येऊन पोहोचूनही क्षितिज आपल्याला सापडत नाही. जितकं दूर चालत जाऊ तितकंच ते जास्त दूर वाटू लागतं, पण मनात तीच ओढ आणि तोच ध्यास काही केल्या आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून अविरतपणे चालत असतो.

 ना वेळेचं भान ना पावलांचं थकणं. एखाद्या संध्याकाळी एका निवांत वळणावर मन विसावा घ्यायला थांबतं आणि थकलेले डोळे क्षितिजाकडे टक लावून पाहत राहतात तेव्हा मनात विचार येतो, आपण उगाच मृगजळाच्या पाठीमागे का धावायचं? आपल्याला जशी अनामिक ओढ वाटते त्या क्षितिजाबद्दल तशीच त्या क्षितिजापलीकडे असणाऱ्या पाखरांना वाटत असेल का? त्या क्षितिजापलीकडे निवांत रस्ते, निवांत वाटा आपल्यापर्यंत येतील का आपल्याला शोधत, जसं आपण त्यांना शोधत जातो तसं? क्षितिजाकडे असेल का आपली वाट पाहणारं, हुरहुर लावणारं एखादं वेडं मन? हे सगळे प्रश्न माझ्या मनात घोंगावू लागतात.

संध्याकाळचे वारे माझ्या मनाच्या लहरी दूर घेऊन जात होते आणि जणू साद घालत होते त्या नव्या क्षितिजाला. किती वेडं असतं आपलं मन! चालताना, तिथवरचा प्रवास करताना आणि थकल्यावरसुद्धा बसल्या जागी कल्पनेत का होईना, त्याला क्षितिज हवं असतं. खरंच ही ओढ येते कुठून? क्षितिज पाखरं आपल्या मनाला दूर खेचून नेत असतात, पण ती समोर का येत नाहीत? का नेत नाहीत माझ्या मनाला त्यांच्यासोबत त्यांचं जग दाखवायला? कारण आता माझं मन थकलंय. पण त्याला खरंच तिथं जायचंय. खूप काळ निघून गेला आहे आणि मी त्या क्षणाची वाट पाहत अजूनही या माळरानावर येऊन बसतो. दूरवर जमिनीला स्पर्श करणाऱ्या आकाशाकडे पाहत. हा माझा प्रवास कधी संपेल हे ठाऊक नाही मला, पण आता मला असं वाटू लागलं आहे की, मी इथंच स्थिर व्हावं, कुठेच जाऊ नये. कारण धावता धावता माझं मन प्रत्येक वळणावर नव्या गोष्टी शिकत गेलं आहे. गंमत म्हणजे आता या मावळत्या सांजवेळी मनाला पुन्हा एका नव्या क्षितिजाची ओढ लागली आहे. स्वतचं क्षितिज होण्याची आणि नव्या पाखरांची वाट पाहण्याची. ती नवी पाखरं मनाच्या माळरानावर येतील आणि माझीच होऊन जातील. मग मी कुणाच्या तरी मनात एक क्षितिज होऊन घर करेन, ज्याची ओढ प्रत्येकाला वाटणाऱ्या क्षितिजाची. कारण हुलकावणी देणाऱ्या क्षितिजाच्या मागे उगीच वेड्यासारखं धावत आपलं आयुष्य खर्ची घालण्यापेक्षा स्वतमध्ये स्वतला शोधत राहणं जास्त चांगलं. तेव्हाच हा प्रवास थांबेल आणि मनाला ज्या पाखरांची ओढ असते तीच क्षितिज पाखरं मनाच्या माळरानावर येतील.