
>> दुष्यंत पाटील
डायबेलीच्या रचनेवर बिथोव्हननं रचलेली तेहेतीस व्हेरिएशन्स ही संगीताच्या इतिहासातली एक अजरामर कलाकृती बनली. यातलं एक-एक व्हेरिएशन बिथोव्हनच्या असामान्य प्रतिभेची ओळख करून देते. वेगवेगळय़ा संगीत प्रकारांमध्ये एखादी रचना कशी वाजू शकेल ते आपल्याला ही व्हेरिएशन्स ऐकताना समजतं.
अँटन डायबेली हा एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातला ऑस्ट्रियामधला एक प्रसिद्ध प्रकाशक होता. तो संगीत प्रकाशित करायचा. तो स्वत संगीत रचनाकारही होता. त्यामुळे त्याला संगीतातली चांगली जाण होती. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ युरोपसाठी युद्धाचा काळ होता. या काळात नेपोलियनच्या फ्रेंच सैन्याची युरोपमधल्या इतर देशांच्या आघाडीच्या सैन्याशी एकापाठोपाठ एक अशी युद्धं चालू होती. इतर देशांच्या आघाडीमध्ये डायबेलीच्या ऑस्ट्रियन साम्राज्याचाही समावेश होत होता. या युद्धांच्या काळात ऑस्ट्रियन साम्राज्याच्या बऱ्याच सैनिकांनी आपला प्राण गमावला होता. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या विधवांसाठी डायबेलीला काहीतरी मदत करण्याची इच्छा होती.
डायबेलीच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी डायबेली स्वत वॉल्टझ या नृत्य प्रकारातली पियानोसाठी एक छोटीशी संगीत रचना करणार होता. ही छोटीशी रचना तो ऑस्ट्रियन साम्राज्यातल्या साऱया प्रसिद्ध संगीतकारांकडे पाठवणार होता. हे सारे संगीतकार स्वतच्या प्रतिभेनं डायबेलीच्या संगीत रचनेत बदल करत स्वतची अशी एक व्हेरिएशन्स करणार होते. त्यामुळं डायबेलीकडं स्वतची एक छोटीशी रचना आणि साऱया संगीतकारांनी त्यावर केलेली व्हेरिएशन्स असं संगीत जमा होणार होतं. ही व्हेरिएशन्स एकाच संगीत रचनेची असल्यानं या साऱया व्हेरिएशन्समध्ये एकता असणार होती. तसंच प्रत्येक संगीतकाराची स्वतंत्र प्रतिभा असल्यानं या व्हेरिएशन्समध्ये विविधताही असणार होती.
हे सारं संगीत त्याला आपल्या प्रकाशनाच्या एका राष्ट्रभक्तिपर अंकात प्रकाशित करायचं होतं. या अंकाच्या पीतून जमा होणारा सारा निधी तो हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या विधवा आणि त्यांची मुलं यांना देणार होता.
एक छोटीशी रचना करून त्यानं शुबर्ट, हमेल, झेर्नी यांसारख्या त्या काळच्या साऱया नामवंत संगीतकारांकडे आपल्या रचनेची एक कॉपी पाठवली. या साऱया संगीतकारांनी आपापली व्हेरिएशन्स रचून डायबेलीकडं परत पाठवली. भविष्यकाळात महान पियानो वादक आणि संगीतकार बनणारा लीझ्स्ट या काळात झेर्नीकडं संगीत शिकत होता. त्याचं वय फक्त 11 वर्षे होतं, पण त्याची प्रतिभा ओळखत झेर्नीनं त्यालाही एक व्हेरिएशन्स रचण्याची संधी दिली.
एकीकडं सारे संगीतकार आपापली व्हेरिएशन्स डायबेलीला पाठवत असताना (एका कथेप्रमाणं) विश्वविख्यात संगीतकार बिथोव्हन यानं मात्र डायबेलीच्या रचनेवर स्वतचं व्हेरिएशन्स रचण्यास नकार दिला. असं म्हणतात की, डायबेलीसारख्या सामान्य संगीतकाराच्या एक सामान्य संगीत रचनेवर स्वत व्हेरिएशन्स रचणं बिथोव्हनला कमीपणाचं वाटत होतं, पण या कथेप्रमाणं डायबेलीनं बिथोव्हनला या कामासाठी चांगली रक्कम दिल्यानं बिथोव्हन रचना करण्यासाठी तयार झाला. दुसऱया एका कथेप्रमाणं बिथोव्हनला आपण एखाद्या अतिशय सामान्य असणाऱया रचनेला परिसस्पर्श करत किती असामान्य दर्जाची व्हेरिएशन्स करू शकतो हे दुनियेला दाखवायचं होतं.
कारण काहीही असो, पण बिथोव्हन डायबेलीच्या रचनेवर स्वतची व्हेरिएशन्स करण्यासाठी शेवटी तयार झाला, पण डायबेलीच्या प्रस्तावाप्रमाणं तो या रचनेवर फक्त एकच व्हेरिएशन करणार नव्हता, तर तो व्हेरिएशन्सची एक मालिकाच रचणार होता. पुढच्या काही काळात त्यानं डायबेलीच्या रचनेवर तब्बल तेहेतीस व्हेरिएशन्स रचल्या.
बिथोव्हननं ही व्हेरिएशन्स रचण्याचं काम 1823 मध्ये पूर्ण केलं. 822 मध्ये रुडॉल्फ नावाच्या संगीतकारानं बिथोव्हनच्या एका रचनेवर 40 व्हेरिएशन्स रचली होती. असंही मानलं जातं की, यातूनच बिथोव्हनला डायबेलीच्या रचनेवर इतक्या जास्त प्रमाणात व्हेरिएशन्स करण्याची प्रेरणा मिळाली. डायबेलीच्या रचनेवर बिथोव्हननं रचलेली तेहेतीस व्हेरिएशन्स ही संगीताच्या इतिहासातली एक अजरामर कलाकृती बनली. एखादी संगीत रचना आणि त्यावरची व्हेरिएशन्स या प्रकारात (आपण मागे पाहिलेली) बाखची गोल्डबर्ग व्हेरिएशन्स आणि बिथोव्हनची डायबेली व्हेरिएशन्स या रचना सर्वश्रेष्ठ मानल्या जातात. यातलं एक-एक व्हेरिएशन बिथोव्हनच्या असामान्य प्रतिभेची ओळख करून देते. वेगवेगळय़ा संगीत प्रकारांमध्ये एखादी रचना कशी वाजू शकेल ते आपल्याला ही व्हेरिएशन्स ऐकताना समजतं.
एखाद्या सामान्य थीमला असामान्य प्रतिभेच्या बिथोव्हनसारख्या संगीतकाराचा परिसस्पर्श झाल्यावर काय होऊ शकतं ते पाहण्यासाठी आपण एकदा तरी
(Diabelli varia) ऐकायलाच हवीत.
[email protected]


























































