
कोल्हापूरकरांच्या विरोधामुळे यापूर्वी प्रशासनाला मागे घ्यावी लागलेली हेल्मेटसक्ती आता पुन्हा उद्यापासून (दि. 22) लागू करण्यात येणार आहे. दोन टप्प्यांत याची अंमलबजावणी होणार असून, पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालये, कंपन्यांतील कर्मचारी, कॉलेजमधील शिक्षकांसह विद्यार्थ्यांना हेल्मेट घालूनच दुचाकी फिरवावी लागणार आहे. तर, दुसऱया टप्प्यात शहरातील सर्व दुचाकीचालकांना हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि त्यांच्याशी संबंधित कार्यालयप्रमुखांवरही प्रत्येकी हजार रुपयांची दंडात्मक कारवाई होणार आहे. यासंदर्भातील लेखी आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी शुक्रवारी काढले आहेत.
हेल्मेटसक्तीविरोधात सध्या कोल्हापूरकरांकडून जोरदार विरोध होताना दिसत नसला, तरी अशी हेल्मेटसक्ती करण्यात पुढाकार घेण्याअगोदर प्रथम रस्ते चांगले करण्यासह वाहनचालकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सोशल मीडियातून जोर धरू लागली आहे.
कोल्हापूर जिह्यात सन 2022-23मध्ये रस्ते अपघातांमध्ये दुचाकी आणि पादचाऱयांच्या अपघातांचे प्रमाण हे सर्वाधिक 70 ते 80 टक्के असल्याचे दिसून आले आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब चिंताजनक असल्याने येथे दोन टप्प्यांत हेल्मेटसक्ती करण्यात येत असल्याचे पाटील यांनी आदेशात म्हटले आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालये, कंपन्या, खासगी संस्था, सर्व औद्योगिक वसाहतीतील कंपन्या अशा 250हून अधिक संस्थांना यासंदर्भातील सूचनावजा पत्रे देण्यात आली आहेत.
प्रथम प्रबोधन,नंतर थेट कारवाई
z बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांत जखमी वा मृत होणारे दुचाकीस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करीत असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे हेल्मेट वापरण्यासंबंधी पहिल्या आठवडय़ात प्रबोधनात्मक व अंमलबजावणीविषयक व्यापक मोहीम जिह्यात राबविण्यात येणार आहे. यानंतरही दुचाकीचालकांनी हेल्मेटचा वापर झाला नाही तर मोटार वाहन कायद्यातील कलम 129 व 194 ‘ड’मधील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी सांगितले.




























































