
>> सीए अभिजित कुळकर्णी
भगवान शंकरांनी मनुष्याला 84 लक्ष प्रकारची आसने सांगितली. त्यातील सारभूत किंवा श्रेष्ठ अशी चार आसने म्हणजे सिम्हमुद्रा, भद्रासन, पद्मासन आणि सिद्धासन. यातील भद्रासन हे शरीराला तणाव देणाऱया आणि पायांची नसे खेचणाऱया आसनांपैकी एक महत्त्वाचे आसन आहे.
सर्वप्रथम दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवून बसावे. पाठीचा कणा सरळ ताठ ठेवावा. त्यानंतर दोन्ही पाय दुमडून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळवून ठेवावे आणि दोन्ही पाय हळूहळू आपल्या जवळ खेचावे. हातांची बोटे एकमेकांत गुंफून हातांच्या ओंजळीने पावलांची पावले घट्ट पकडून ठेवावी. जेणेकरून पावले पुढे सरकून पकड आणि मांडय़ांवरचा तणाव ढीला पडणार नाही आणि आपल्या मांडय़ांच्या नसांना चांगल्या प्रकारे ताण मिळू शकेल. पायाचे तळवे जास्तीत जास्त जवळ घ्यावेत. थोडावेळ मन शांत करून स्थिर बसावे.
त्याच्यानंतर फुलपाखरू जसे आपले पंख फडफडविते त्याप्रमाणे मांडय़ा वर-खाली कराव्यात. आसनाचे नाव जरी भद्रासन असले तरी या क्रियेमुळे याला इंग्लिशमध्ये ‘बटरफ्लाय पोज’ असेही म्हणतात. थोडय़ा वेळानंतर मांडय़ा स्थिर कराव्यात. नमस्कार करावा आणि हात पर्वतासनाप्रमाणे उंच खेचून ठेवावेत. डोळे बंद करावेत. भ्रूमध्यामध्ये ओंकाराचं ध्यान करावे. दीर्घ श्वसन करून ओंकाराचा उच्चार करावा आणि त्यानंतर पाठीचा कणा शक्य तितका ताठ ठेवून सावकाशपणे खाली वाकावे आणि आपले कपाळ जमिनीला लावायचा प्रयत्न करावा. हात पुढे सोडावेत. हळूहळू खाली वाकून हाताची कोपरे सर्वप्रथम जमिनीला लावायचा प्रयत्न करावा. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पायांतील मुख्यत्वे मांडीच्या नसांना अतिशय चांगला तणाव मिळतो. त्यामुळे थोडी वेदना पायाच्या मांडय़ांमध्ये आणि शिवणीमध्ये होऊ शकते. ती वेदना सहन करावी. मन शांत ठेवावे. उच्छ्वासाबरोबर आणखी खाली वाकायचा प्रयत्न करावा. हळूहळू खाली वाकून कपाळ जमिनीला लावावे. शक्य झाल्यास हनुवटी जमिनीला लावावी. या आसनालाच भद्रासन असे म्हणतात.
पर्यायी नावे
हे आसन करावयास कठीण असल्यामुळे या आसनाला ‘गोरक्षासन’ असेही म्हटले आहे. महान योगी गोरक्षनाथ यांच्या सन्मानार्थ आसनाला त्यांचे नाव दिले गेले आहे. आधुनिक काळात काहीजण हा आसनाला ‘बद्धकोण’ आसन या नावानेही ओळखतात. प्राचीन काळामध्ये या आसनाला काही ठिकाणी ‘ब्रह्मचर्यासन’ असेही म्हटलेले आढळून येते.
भद्रासनाचे लाभ
भद्रासनामध्ये आपल्या मांडय़ांमधून गेलेल्या नसांना अतिशय उत्तम ताण मिळतो. पाठीचा कणा आणि पंबरेलाही चांगला ताण मिळतो. शरीरामध्ये लवचिकता येते. हा ताण मिळाल्यामुळे आपले मनही शांत होते, स्थिर होते. या आसनामुळे शरीरातील अनेक नाडय़ांची शुद्धी होते आणि अनेक प्रकारचे रोग दूर होतात. या आसनाच्या अभ्यासामुळे माणसाच्या मनाला येणारा थकवा दूर होतो. या आसनामध्ये मूलबंध आपोआप साधला जातो. या आसनाचा थेट परिणाम हा सप्ताचक्रांतील मूलाधार चक्रावर होतो. हे चक्र आपले गुदद्वार आणि जननेंद्रिय यांच्यामध्ये असलेल्या शिवणीच्या थोडे वर असते. आपले मनोव्यापार आणि त्यातील तरंगांचे उगमस्थान मूलाधार चक्रातून आहे असे आपली शास्त्रs सांगतात. भद्रासनाच्या अभ्यासाने मन स्थिर होते, एकाग्र होते.
श्रीगणेश आणि भद्रासन
मूलाधार चक्राची देवता ही श्री गणेश होय. त्वं मूलाधारस्थितो।़सि नित्यम्। आणि म्हणूनच हे आसन गणेशाला प्रिय असावे. या आसनाच्या अभ्यासाने आपल्या चित्तवृत्ती नियंत्रित होतात. अष्टविनायकापैकी किंबहुना गणपतीच्या बहुतेक मूर्ती या भद्रासनातच बसलेल्या आपल्याला आढळून येतात.
योगशिक्षक, भारतीय योग मंदिर. www.bymyoga.in


























































